लॉक डाऊनमुळे सध्या शहरातील भटक्या जनावरांचे अन्नपाण्याविना हाल होत आहेत. अशाच भुकेल्या मोकाट गायींच्या एका कळपाला मिठाई बरोबरच कोबीचा पाला व पाणी खाऊ घालण्याचे स्तुत्य कार्य आरटीओ सर्कल येथील पुरोहित स्वीट्सचे मालक जगदीश पुरोहित यांनी केले.
आरटीओ सर्कल येथील आरटीओ कार्यालयासमोर जगदीश पुरोहित यांचे पुरोहित स्वीट मार्ट आहे. राज्य शासनाने काही अंशी मिठाईची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे आज मंगळवारी सकाळी जगदीश पुरोहित आपले दुकान काही वेळेसाठी उघडण्या साठी आले. त्यावेळी भुकेल्या मोकाट गाईंचा एक कळप आपल्या वासरांसह अन्नपाण्याच्या शोधार्थ रस्त्यावर घुटमळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तेंव्हा पुरोहित यांनी लागलीच आपल्या दुकानातील मिठाई आणि चपात्या त्या भुकेल्या गाईंना खावयास दिल्या. त्याचप्रमाणे कोबीचा पाला मागवून तोदेखील त्यांना खावयास घातला, शिवाय त्या तहानलेल्या जनावरांना त्यांनी पोट भरून पाणी दिले.
याकामी जगदीश पुरोहित यांना राजकुमार खटावकर, महेश लाड, युवराज पुरोहित, विनोद राजपूत, निलेश, स्फूर्ती हिरेमठ आदींनी सहकार्य केले. मोकाट गाईंच्या या कळपाला आपण आज सायंकाळी देखील मिठाई आणि कोबीचा पाला खाऊ घालणार असल्याचे जगदीश पुरोहित यांनी बेळगाव लाईव्हला सांगितले.