उपचारा अंती कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरा होणारा जिल्ह्यातील पहिला रुग्ण बेळगुंदी (ता.बेळगाव) गावातील होता. आता “कंटेनमेंट झोन”च्या याबाबतीतही तसेच घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सध्या बेळगुंदी गाव आपला कंटेनमेंट झोनचा (निर्बंधित क्षेत्र) कालावधी पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असून तसे झाल्यास कंटेनमेंट झोनमधून मुक्त होणारे बेळगुंदी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे.
प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. कंटेनमेंट झोन हा देखील या उपाययोजनांचा एक भाग आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी, येळ्ळूर, हिरेबागेवाडीसह शहरातील कॅम्प, अझमनगर, अमननगर आणि आझाद गल्ली हे भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनचा कालावधी 28 दिवसांचा असतो. एखाद्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास ज्या दिवशी तो रुग्ण आढळून येतो त्या दिवसापासून 28 दिवसांसाठी संबंधित ठिकाण कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जाते, अशी माहिती बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ राजेंद्र के. व्ही यांनी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना दिली.
कोरोना बाधित रुग्णाकडून संबंधित ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्याला आळा घालण्यासाठी संबंधित ठिकाण निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. ज्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाहेरील कोणत्याही वाहन अथवा व्यक्तीला या क्षेत्राच्या आत जाता येत नाही किंवा आतील लोकांना बाहेर जाता येत नाही. यामुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यास मदत होते. कंटेनमेंट झोन असणाऱ्या ठिकाणी पुन्हा एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळून आला तर तो रुग्ण आढळलेल्या दिवसापासून पुन्हा 28 दिवसासाठी कंटेनमेंट झोनचा कालावधी वाढविला जातो, असेही सीईओ जगदीश के. एच. यांनी स्पष्ट केले.
जि. पं. सीईओ राजेंद्र के. व्ही यांनी दिलेली माहिती लक्षात घेता बेळगुंदी येथे गेल्या 3 एप्रिल 2020 रोजी कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. जो नुकताच उपचाराअंती पूर्णपणे बरा होऊन म्हणजे कोरोना मुक्त होऊन गावी परतला आहे. बेळगुंदी गावाला कंटेनमेंट झोन घोषित करून आज बुधवारी 20 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता या ठिकाणचा कंटेनमेंट झोनचा कालावधी समाप्त होण्यास अवघ्या 8 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
सुदैवाने आतापर्यंत तरी बेळगुंदी येथे कोरोना बाधित नवा रुग्ण आढळून आलेला नाही. तेंव्हा आता उर्वरित 8 दिवसांच्या कालावधीत जर बेळगुंदी येथे नव्याने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही तर येत्या 1 मे 2020 रोजी बेळगुंदी हे गाव कंटेनमेंट झोन अर्थात निर्बंधित क्षेत्रातून मुक्त होणार आहे आणि तसे झाल्यास कंटेनमेंट झोनमधून मुक्त होणारे ते जिल्ह्यातील पहिले गाव ठरणार आहे.