कडोली परिसरात ग्राहकांची लुबाडणूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत ग्रामपंचायत तातडीने लक्ष देऊन संबंधितांना ताकीद द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कडोली ग्रामपंचायतीने संबंधित दुकानदारांना कोणताही दर निश्चित न करता वितरण करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे अनेकांची गोची झाली असून याबाबत तातडीने लक्ष घालून योग्य तर ग्राहकांना द्यावा अशी मागणी होत आहे.
लॉक डाऊन असल्यामुळे अनेकांची मोठी गोची झाली आहे. साहित्य खरेदी करण्यापासून ते दुधा पर्यंत मोठ्या येरझाऱ्या माराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत दुकानदारांनी मात्र ग्राहकांची लूट करण्यात सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा फायदा अनेक दुकानदार दुप्पट दर घेत आहेत. मात्र याची तक्रार केल्यास कोणतीही दखल घेत नसल्याचे उघडकीस येत आहे. असाच प्रकार कडोलीमध्ये घडत आहे.
कडोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या दुकानदारांना साहित्याचे दर वाढवू नये अशी आशा व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने एक पत्रक काढून त्यांना समजून घेणे गरजेचे होते. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याने आता ग्रामपंचायत यांच्यावर कोणती कारवाई करणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. किरकोळ साहित्यासह इतर साहित्याचे दर वाढविण्यात आल्याने मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांचे कंबरडे मोडण्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित ग्रामपंचायतीने प्रत्येक दुकानदाराला निश्चित वेळेत दुकान सुरू करण्याचे सांगितले आहे. निश्चित वेळेत दुकान सुरू झाली असली तरी साहित्याचे दर मात्र डबल करून ते विक्री करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. मात्र यावर कारवाई कोण करणार हा प्रश्न अंतर्मुख करणारा ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांना सोयीस्कर होईल याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. अशीच लूट सुरू असल्यास अनेक जण उपाशी मरण्याची वेळ येणार आहे. याचा विचाराचा ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.