लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या शिवाजीनगर पहिला क्रॉस येथे रस्त्यावर घालण्यात आलेले बॅरिकेड्स हटवून ते 27 नं. मराठी शाळेजवळील मेन रोडवर घालावेत अशी जोरदार मागणी शिवाजीनगर येथील नागरिकांनी केली आहे.
लॉक डाऊनमुळे त्रिवेणी हॉटेल नजीकच्या निंबाळकर बिल्डिंग समोर मेन रोडवर बॅरिकेड्स घालून या रस्त्यावरील वाहतूक शिवाजीनगर दुसऱ्या व तिसऱ्या गल्लीत वळविण्यात आली होती. यामुळे या गल्लीमध्ये अलीकडे वाहने आणि नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाचा परिस्थितीत अशी वर्दळ सदर गल्लीतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता ध्यानात घेऊन यासंदर्भात शिवाजीनगर येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने रविवारी मार्केट विभागाचे एसीपी एन व्ही बरमनी यांची भेट घेतली. तसेच सध्या घातलेल्या बॅरिकेड्समुळे निर्माण झालेली समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तेंव्हा नागरिकांच्या सूचनेची तात्काळ दखल घेऊन एसीपी बरमनी यांनी निंबाळकर बिल्डिंग येथील बॅरिकेड्स हटवून ते शिवाजीनगर पहिल्या क्रॉस येथे घातले आहेत. तथापि त्यामुळे आता पंजीबाबा मठ वगैरे ठिकाणी जाणारे नागरिक आणि वाहन चालक शिवाजीनगर तीसरा, चौथा व पाचवा क्रास तेथील मार्गांचा वापर करू लागले आहेत. परिणामी शिवाजीनगर आतील वाढत्या वर्दळीची समस्या कायमच आहे.
तेंव्हा बॅरिकेड्स शिवाजीनगर पहिला क्रॉस येथे न घालता 27 नं. मराठी शाळेसमोर घालावेत. ही जागा अत्यंत योग्य असून याठिकाणी बॅरिकेड्स घातल्यास वीरभद्रनगर आदी भागातून शिवाजीनगरमध्ये होणारी वाहने व नागरिकांची वर्दळ बंद होऊन शिवाजीनगर परिसर कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित होईल, असे शिवाजीनगर नागरिकांच्या शिष्टमंडळाचे मत आहे.
रविवारी एसीपी एन. व्ही. बरमनी यांची भेट घेणाऱ्या शिवाजीनगर येथील नागरिकांच्या मंडळांमध्ये राजू खटावकर, विनायक बावडेकर, जगदीश पुरोहित, विजय पवार, महेश लाड, इलियास, तांबटकर, संजय पाटील आदींचा समावेश होता.