शहरातील अनेक भागात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नाकाबंदी केल्यामुळे नागरिकांना समस्या उदभावत असून हे अडथळे दूर केले जातील अशी ग्वाही पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.
कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्यामुळे जनतेत भीती निर्माण झाली असून त्यामुळे अनेक गल्लीतील नागरिकांनी आपल्या भागात नाकाबंदी केली आहे.गल्लीच्या दुतर्फा झाडांच्या फांद्या,खांब,काटे टाकून गल्लीत प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला आहे.त्यामुळे अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
दूध द्यायला येणारे दूधवाले आणि अन्य व्यक्तींना रस्त्यावर अडथळे टाकल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.गल्लीतील एखाद्या व्यक्तीला अचानक तब्येत बिघडली तरी त्याला दवाखान्याला जाण्यासाठी पहिलेंदा अडथळा दूर करावा लागणार आहे. या शिवाय बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसां करिता देखील हे अडथळे अडचणीचे ठरू नयेत यासाठी शहरातील अधिकाऱ्यांना सूचना देऊन अडथळे दूर करू असे ते म्हणाले.केवळ बफर झोन आणि कंटेमेंट भाग वगळता सर्व ठिकाणी 24 तास जीवनावश्यक वस्तू मिळतील असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी,पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार ,जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरंगी, जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र यांनी शहरातील सर्व पत्रकार व माध्यम प्रतिनिधींची संवाद बैठक घेतली त्या बैठकीत कोरोना बाबत पत्रकार व पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनाची भूमिका समन्वय बाबत चर्चा झाली.