कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहर विशेष करून ग्रामीण भागामध्ये नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने रस्ते बंद करण्याचे जे प्रकार घडत आहेत ते गुन्ह्यास पात्र ठरणारे असल्याने ते त्वरित थांबवण्यात यावेत. तसेच बंद करण्यात आलेले रस्ते त्वरित खुले केले जावेत अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि बेळगावात सापडलेले 3 कोरोना बाधित रुग्ण या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील काही गल्ल्यांचे रस्ते नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत. तसेच तालुका पातळीवर गावागावांमध्ये देखील परगावची व्यक्ती गावात येऊ नये म्हणून गावकऱ्यांकडून गावात येणारे प्रमुख रस्ते स्वयंस्फूर्तीने बंद केले जात आहेत. तथापि अशा प्रकारे रस्ते बंद केले जात असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे एखाद्या अत्यावश्यक कामासाठी जावयाचे झाल्यास रस्त्यावर निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे अडवणूक होत आहे. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असल्यास बंदावस्थेतील रस्ते त्रासदायक ठरत आहेत.
नागरिकांनी स्वतःहून सार्वजनिक रस्ते बंद करण्याचा हा प्रकार गुन्ह्यास पात्र ठरणार आहे. तेंव्हा नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेले रस्ते त्वरित खुले करावेत अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा रविवारी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.