जिल्हा प्रशासनाकडून शास्त्रीनगर येथील “पाटीधार भवन” हे मंगल कार्यालय काॅरन्टाईन केलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी वापरले जाणार असल्याची कुणकुण लागल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने जमा होऊन पाटीधार भवन काॅरन्टाईन रुग्णांसाठी देण्यास तीव्र विरोध दर्शविल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
बेळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची पर्यायाने काॅरन्टाईन केलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी कांही सरकारी अधिकाऱ्यांनी काॅरन्टाईन केलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी शास्त्रीनगर मेनरोड येथील पाटीधार भवनाला गुपचुप भेट देऊन पाहणी केल्याचे समजते. तथापि याची कुणकुण लागताच पाटीधार भवन परिसरासह संपूर्ण शास्त्रीनगरातील नागरिकांनी सदर मंगल कार्यालय काॅरन्टाईन रुग्णांसाठी देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
कारण पाटीधार भवन ज्याठिकाणी आहे तो परिसर 100 टक्के लोकवस्तीचा असून या भवनाला अगदी लागून लोकांची घरी आहेत. परिणामी याठिकाणी काॅरन्टाईन रुग्णांना ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी पाटीधार भवन काॅरन्टाईन केलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी वापरले जाऊ नये, अशी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
जिल्हा प्रशासनाने पाटीधार भवन येथे काॅरन्टाईन केलेल्या रुग्णांना ठेवण्याचा निर्णय घेतल्यास त्याला तीव्र विरोध करण्याची तयारी शास्त्रीनगर येथील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात शनिवारी सकाळी पाटीधार भवन येथे शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांची बैठक पार पडली. याप्रसंगी गणेश दड्डीकर, महेश पाटील, नवीन कुंटे, विपुल मुरकुटे, मुतकेकर आदी प्रमुख नागरिकांसह सुमारे 100 युवक उपस्थित होते. काॅरन्टाईनसाठी जिल्हा प्रशासनाने पाटीधार भवन ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करण्यासाठी शास्त्रीनगर भागातील सुमारे 1,500 हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याचे निवेदन तयार ठेवण्यात आले आहे.