बेळगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या पन्नासचा आकडा पार केल्याने अनेकांना धास्ती लागून राहिली आहे. त्यामुळे अनेकजण घरी बसण्यात धन्यता मानत आहेत. अशा परिस्थितीत सीमावर्ती भागातही मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात येत असून चंदगड तालुक्यातील काही लागून असलेल्या गावांना सीलबंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची गोची होत असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटक सीमाभागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने चंदगड तालुक्यात मोठ्याप्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यापासून बचावात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. बेळगाव सीमेजवळ असलेल्या बहुतेक सर्व गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना दक्षता समित्या या अधिक खबरदारी घेत आहेत.
अनेक गावे सील करण्यात आली असून बेळगावशी असलेला सर्व व्यवहार बंद करण्यात आला आहे. कोणत्याही कारणासाठी बेळगावला जाण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे सर्व जीवनावश्यक साहित्याची खरेदी गडहिंग्लज बाजारपेठेतून केली जात आहे. कोरोनाचा हा वाढत धोका पाहता सिमेपासून काही अंतरावर असलेल्या गावामध्ये देखील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून दक्षता कमिटीचे सदस्य पहारा देत आहेत.
अशीच परिस्थिती कोवाड कुदनुर आणि इतर लगतच्या गावांमध्ये घेण्यात आली आहे. बेळगावला कोणत्याही नागरिकांनी जाऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी जसे की धान्य दुकान, बँक ऑफ महाराष्ट्र या गर्दीच्या ठिकाणी लोकांना सोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. गावात प्रवेश होऊ नये यासाठी पोलीस पाटलानाही जुंपण्यात आले आहे. सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. जोपर्यंत बेळगाव जिल्हा कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत अशी खबरदारी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.