संपूर्ण देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडू नये असे आवाहन वारंवार पोलीस करत आहेत. याला काहीजण प्रतिसाद देत आहेत तर काहीजण वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. अशाच प्रकारची घटना हलगा-मच्छे बायपास रस्त्यावर वारंवार घडत आहे. या मार्गावर क्रिकेट खेळणारे अधिक झाले आहेत. क्रिकेट खेळणारे पळून जातात आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचा मार खावा लागतो, अशी अवस्था झाली आहे.
हलगा-मच्छे बायपास येथे काही तरुण क्रिकेट खेळण्यासाठी दररोज जात आहेत. याची माहिती मिळतात पोलीस त्या ठिकाणी हजेरी लावत आहेत. मात्र पोलिसांची वाहने दिसताच तेथून क्रिकेट खेळणारे पलायन करतात आणि शेतात काम करणाऱ्यांना मात्र पोलिसांचा मार खावा लागतो. त्यामुळे पोलिसांची कारवाई म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी अशी अवस्था झाली आहे.
हलगा मच्छे बायपासमध्ये मजगाव, अनगोळ, वडगाव आधी भागातील जमिनी गेल्या आहेत. दरम्यान ज्या ठिकाणी हलगा-मच्छे बायपाससाठी रस्ता करण्यात आला आहे त्या ठिकाणी संबंधित विभागातील तरुणाई क्रिकेट खेळण्यात मग्न असतात. सध्या लॉक डाऊन असल्यामुळे सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. मात्र काही तरुण याकडे दुर्लक्ष करून क्रिकेट खेळण्याच्या नादात आहेत. त्यामुळे पोलिसांनी अनेकदा त्या ठिकाणी कारवाई केली आहे. मात्र बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हलगा मच्छे बायपास रस्त्या लगत-असणार्या शेतामध्ये अनेक शेतकरी हंगाम साधताना दिसत आहेत. मात्र काही क्रिकेट खेळणाऱ्या तरुण मुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत तरुण पोलिसांना पाहून पळून जातात मात्र शेतकऱ्यांना पोलिसांचा मार खावा लागतो. त्यामुळे पोलिसांनीही यापुढे चौकशी करूनच कायद्याचा बडगा उगारावा असे आवाहन शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.