बेळगावच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गर्दी फार होत असल्याने जिल्हा प्रशासनाने मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांशी चर्चा करून गावाबाहेर चार भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गर्दी फार होत असून सामाजिक अंतर राखले जात नाही.सामाजिक अंतर राखले नाही तर आरोग्यासाठी धोकादायक असल्याने शहरा बाहेर चार भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी दिली आहे.
हिंडलको मैदान,आर टी ओ मैदान,पोद्दार स्कुलचे मैदान आणि जुन्या धारवाड रोडवरील पतंग महोत्सवाचे मैदान अशा चार ठिकाणी भाजी मार्केट सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत.रविवार पर्यंत भाजी मार्केट एपीएमसी मध्ये सुरू राहील.लॉक डाऊनच्या कालावधीत व्यापारी,खरेदीदार,हमाल आदी सगळ्यांनी नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणात कोणतीही अडचण उद्भवणार नाही.सोमवारपासून गावाबाहेरील चार मैदानात भाजी विक्री केली जाणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.