कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉक डाऊनचा कालावधी येत्या 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे यंदाच्या रमजान काळातील मस्जिद व दर्गा येथील सामूहिक नमाज (प्रार्थना) रद्द करण्यात आल्या असल्याचा आदेश कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्यांक कल्याण, वक्फ आणि हाजी खात्याने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे काढला आहे.
भारतासह जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. यासाठी मुस्लिम बांधव महिनाभर रोजा अर्थात उपवास पाळतात. यंदाचा रमजान महिना येत्या 24 किंवा 25 एप्रिल 2020 रोजी सुरू होणार आहे. तथापि देशातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी धार्मिक विधी, धार्मिक सभा, सामूहिक प्रार्थना यावर बंदी घातली आहे.
त्या अनुषंगाने भारत सरकारच्या केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या सेंट्रल वक्फ कौन्सिलच्या सेक्रेटरीनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान काळात मस्जिद, दर्गा, इमाम बरास आदी ठिकाणी होणाऱ्या सामूहिक प्रार्थना, मजलीस व इफ्तार रद्द करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे अझान मोठ्या आवाजात दिले जाऊ नयेत. शुक्रवारच्या प्रार्थनेसह नमाज फक्त पेश इमाम, मौलाना आणि मस्जिद कर्मचाऱ्यांकडून अदा केली जावी. राज्यातील कोणत्याही मस्जिद अथवा दर्गा येथे नागरिकांना जुम्मा नमाजसह सामूहिक नमाज अदा करण्यास परवानगी दिली जाऊ नये. यासंदर्भात मस्जिद आणि दर्गा व्यवस्थापनाने तीन भाषांमध्ये सार्वत्रिक घोषणा करून जनजागृती करावी, असे आवाहनही केले आहे.
थोडक्यात कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्यांक कल्याण, वक्फ आणि हाजी खात्याने काढलेल्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा रमजान काळात मुस्लिम बांधवांच्या मशिदी आदी प्रार्थना स्थळांमधील जुम्मा व तरवी प्रार्थनेसह पाच वेळा नमाज पठणावर बंदी असणार आहे. दावत-ई-सहरी आणि इफ्तार यांच्यावर देखील बंदी असेल. तसेच रमजाननिमित्त मोहल्ल्यामध्ये वाटण्यासाठी मशिद अथवा दर्गा आवारात गंजी, सरबत वगैरे बनविण्यावर बंदी असणार आहे.