Sunday, January 12, 2025

/

नको मृतदेहांची फरफट, करा शववाहिकांची व्यवस्था

 belgaum

लॉक डाऊनच्या काळात मृतदेहांची फरफट नको अशी मागणी बेळगावकर करत आहेत. लॉक डाऊनचा गैरफायदा घेत सध्या खाजगी शववाहिका चालकांकडून नागरिकांची लूट केली जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने शहरात सत्वर शववाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य लोकांची गैरसोय होता आहे. विशेष करून ज्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निवर्तली असेल अशा कुटुंबातील लोकांना सध्या अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने शववाहिकेची समस्या फार मोठी आहे. सध्या लॉक डाऊनचा गैरफायदा घेत अनेक खाजगी शववाहिका चालकांकडून लूट केली जात आहे. लॉक डाऊनमुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधी नागरिक मोठ्या संख्येने जमू शकत नाहीत. अंत्यविधी पार पाडण्यासाठी मनुष्यबळ फार कमी असल्यामुळे निधन पावलेल्या व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाणे जिकरीचे ठरत आहे. निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातलगांना त्या व्यक्तीचे पार्थिव हॉस्पिटलमधून घरी आणण्यासाठी अथवा घरातून स्मशानभूमीकडे नेण्यासाठी शववाहिकेची मदत घ्यावी लागत आहे.

Demand hearsh van
Demand hearsh van

याचा गैरफायदा खाजगी शववाहिका चालक घेत असून त्यांच्याकडून मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरू आहे. सध्या लोकांची परिस्थिती चांगली नाही, खाजगी शववाहिकेसाठी चार-पाच हजार रुपये मोजणे त्यांना परवडणारे नाही. तथापि घरच्या व्यक्तीचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांना पैशाची जमवाजमव करून नाईलाजाने खाजगी शववाहिकेची सोय करावी लागत आहे. यासाठी सरकारने शहरात ठिकठिकाणी सत्वर शववाहिकांची व्यवस्था करून नागरीकांचा दुवा घ्यावा, अशी प्रतिक्रिया फुले रोड, वडगाव येथील पार्वती मोहन मंडोळकर यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी शुक्रवारी व्यक्त केली.

फुले रोड वडगाव येथील पार्वती मोहन मंडोळकर यांचे शुक्रवारी येळ्ळूर रोडवरील केएलई सेंट्रल चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सुदैवाने धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर हे मंडोळकर कुटुंबीयांच्या परिचयातील असल्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या मालकीची रुग्णवाहिका पार्वती मंडोळकर यांच्या अंत्यविधीसाठी उपलब्ध करून दिली. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर हे आपली रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध करून देत असतात. तथापि शहरात एकाच वेळी बऱ्याच जणांचे निधन होऊ शकते. त्यामुळे सुरेंद्र अनगोळकर सर्वांच्याच मदतीला जाऊ शकत नाहीत. तेंव्हा सध्याच्या लोकांच्या परिस्थितीत तरी शासनाने नागरिकांसाठी शहरात ठिकठिकाणी शववाहिका उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे मत शुक्रवारी पार्वती मंडोळकर यांच्या अंत्यविधीस उपस्थित असलेल्या मोजक्या नागरिकांमध्ये व्यक्त होत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.