कोणत्याही संकटग्रस्त परिस्थितीमध्ये बेळगाव जिल्ह्याला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचा (एमएलआयआरसी) नेहमीच आधार वाटत आला आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती देखील त्याला अपवाद नाही. एमएलआयआरसीने कोरोना विरुद्ध देखील दंड थोपटले असून तूर्तास त्यांच्याकडून गोरगरीब व गरजूंना तयार अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे हातावर पोट असलेल्यांसह गोरगरीब आणि गरजू लोकांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. एमएलआयआरसीने सध्या यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
देशासाठी जीव धोक्यात घालण्याच्या आपल्या नेहमीच्या वृत्तीनुसार आपल्या आरोग्याची पर्वा न करता मराठा सेंटरचे जवान गेल्या आठवडाभरापासून तयार अन्नाची पाकिटे आणि जीवनावश्यक वस्तूंचे पद्धतशीर वाटप करत आहेत.
आतापर्यंत मराठा रेजिमेंटल सेंटरकडून सावली वृद्धाश्रम, होम फॉर द होमलेस, सिद्धार्थ बोर्डिंग स्कूल, सायुजम संस्था आधी ठिकाणच्या गरीब गरजू लोकांसह सहाय्यक ज्येष्ठ नागरिकांना तयार अन्नाची पाकिटे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. आता लॉक डाऊनचा कालावधीही समाप्त होईपर्यंत मराठा रेजिमेंटल सेंटरकडून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुरात देखील मराठा जवानांचे योगदान कौतुकास्पद होते आता कोरोनाच्या लढाईत देखील मराठा जवान अग्रेसर आहेत.