कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशावरून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली असून मास्क वापराची सक्ती करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर 100 रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
बेळगावचे दंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा हा लेखी आदेश जाहीर केला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या कालावधीत अथवा कालावधी समाप्त झाल्यानंतर कोणीही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. त्याचप्रमाणे मास्कचा सक्तीने वापर करावा.
कामाच्या ठिकाणी देखील मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. सार्वजनिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी हा आदेश बजावण्यात आला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना 100 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. हा आदेश बुधवार दि. 22 एप्रिल 2020 पासून जारी करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बोमनहळ्ळी यांनी आपल्या लेखी आदेशाद्वारे जाहीर केले आहे.