मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस देखील शेवटी माणूसच असतात, त्यांना माणुसकी असते हे शनिवारी दाखवून दिले. जेंव्हा त्यांनी लॉक डाऊनमुळे असहाय्य बनलेल्या शिवाजीनगर येथील एका वृद्ध जोडप्याला स्वखर्चाने जीवनावश्यक साहित्य देण्याबरोबरच स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली.
याबाबतची माहिती अशी की, शिवाजीनगर फर्स्ट मेन 5 वा क्रॉस येथील एका इमारतीतील उच्च रक्तदाब आणि दम्याच्या विकाराने त्रस्त असलेल्या एका वृद्ध आजारी जोडप्याची लॉक डाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून उपासमार सुरू होती. सदर बाब कानावर येतात मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल यांनी तात्काळ शिवाजीनगर येथील स्वयम् एज्युकेशन सोसायटीच्या लिटल् किड्स स्कूल आणि विनय डेव्हलपर्सच्या सेवाभावी कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शनिवारी पीएसआय विठ्ठल यांनी स्वखर्चाने संबंधित जोडप्याला पुरेसे जीवनावश्यक साहित्य त्यांच्या घरी जाऊन देऊ केले.
पीएसआय विठ्ठल यांच्या विनंतीला मान देऊन स्वयम् एज्युकेशन सोसायटीच्या लिटल् किड्स स्कूल आणि विनय डेव्हलपर्सतर्फे लॉक डाऊन समाप्त होईपर्यंत त्या वृद्ध जोडप्याची दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त शनिवारी पुरोहित स्वीट मार्टचे मालक जगदीश पुरोहित यांनी संबंधित त्या जोडप्याला ब्रेड, बटर, बिस्किट आदी बेकरीचे साहित्य दिले. याप्रसंगी पीएसआय विठ्ठल आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते महेश लाड, विनायक बावडेकर, नारायण, राजू खटावकर, जगदीश पुरोहित, संजय पाटील, इलियास भाई आदी उपस्थित होते.