कर्नाटक राज्य शासनातर्फे गुरुवार दि. 30 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गेल्या 24 तासात आणखी 30 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 565 झाली आहे. यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला असून 229 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार 29 एप्रिल सायंकाळी 5 वाजल्यापासून गुरुवार दि. 30 एप्रिल 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 30 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 14, बेंगलोर शहरातील 10, विजयपुरा येथील 2 आणि मंगळूर, तुमकुर, दावणगिरी व कलबुर्गी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बेंगलोर शहरातील 10 रुग्णांपैकी सहा रुग्ण महिला आहेत. बेळगाव जिल्ह्यात हिरेबागेवाडी येथे 11 आणि हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथे 3 असे एकूण 14 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यापैकी 7 महिला रुग्ण आहेत.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सध्या 565 इतकी असून यापैकी 229 जणांना उपचाराअंती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ऍक्टिव्ह केसेस 314 असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका रुग्णाचा कोरोनामुळे नव्हे तर यकृताच्या आजाराने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बेंगलोर शहरांमध्ये सर्वाधिक 141 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यापैकी 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर म्हैसूर जिल्हा असून या जिल्ह्यात 88 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण मात्र शून्य आहे. सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत बेळगावचा क्रमांक तिसरा आहे. बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 67 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यापैकी 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ॲक्टिव केसेस 59 आहेत.