कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काॅरन्टाईन दिलेल्या 24 जणांना मंडोळी (ता. बेळगाव) येथील मोरारजी देसाई होस्टेलमध्ये ठेवण्यास मंडोळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने “त्या” सर्वांना कोर्टासमोरील अंजुमन हॉलमध्ये हलवावे लागल्याची घटना शनिवारी घडली.
याबाबतची माहिती अशी की प्रशासनाकडून काॅरन्टाईन अर्थात विलगीकरण केलेल्या 24 जणांना मंडोळी येथील मोरारजी देसाई होस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि याबाबतची कुणकुण लागताच समस्त मंडोळीवासियांनी याला विरोध दर्शविला. तसेच मंडोळी गावातील ग्रामस्थ, युवक आणि महिलांनी शेकडोच्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमून जोरदार निदर्शने केली. त्याचप्रमाणे आपल्या गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होईल या भीतीने काॅरन्टाईनसाठी “त्या” 24 जणांना गावाबाहेरील मोरारजी देसाई हॉस्टेलमध्ये ठेवण्यास विरोध केला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या निर्णयानुसार काॅरन्टाईन दिलेल्या रुग्णांना मंडोळीत ठवण्यात येणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसे असेल तर गावाबाहेर असलेल्या मोरारजी मोरारजी देसाई हॉस्टेलमधील कोणालाही गावामध्ये प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी मंडोळी गावातील पंचानी केली.
एकंदर संबंधित 24 जणांना मंडोळी येथील मोरारजी देसाई होस्टेलमध्ये ठेवण्यास मंडोळी ग्रामस्थांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन अखेर त्या 24 जणांना कोर्ट कंपाऊंड समोरील अंजुमन हॉलमध्ये काॅरन्टाईनसाठी हलविण्यात आले. प्रशासनाच्या या निर्णयाचे मंडोळी ग्रामस्थांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.