कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लाॅक डाऊनच्या काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेळगावातील कल्पवृक्ष फाऊंडेशनतर्फे अल्पोपहार वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे.
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटनजीकच्या कल्पवृक्ष फाऊंडेशनतर्फे देशव्यापी लाॅक डाऊनची घोषणा झाल्यापासून शहरात विविध ठिकाणी बंदोबस्त असणाऱ्या विशेष करून तिसरे रेल्वे गेट आणि मजगाव क्रॉस येथे बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपहार देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत कल्पवृक्ष फाउंडेशनतर्फे किल्ला परिसर, धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प रहदारी पोलीस स्थानक आदी परिसरात बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांना चहा, बिस्किट, बटरमिल्क, केळी आदींच्या स्वरूपात अल्पोपहाराची वाटप करण्यात आले आहे. लाॅक डाऊनच्या काळात टिळकवाडी तीसरे रेल्वे गेट तसेच मजगांव क्राॅस येथे बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तर या फाउंडेशनतर्फे दररोज अल्पोपहाराचे वाटप केले जाते.
सदर उपक्रम राबविण्यासाठी कल्पवृक्ष फाऊंडेशनच्या सविता कांबळे, सुचिता कुलकर्णी, आनंद नायक, डॉ. दीपक कुलकर्णी आणि फाउंडेशनचा कर्मचारीवर्ग विशेष परिश्रम घेत आहे.
कल्पवृक्ष फाउंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या एका आदिवासी कुटुंबाला देखील मदत करण्यात आली आहे. खानापूर – जांबोटी मार्गापासून सुमारे 7 कि. मी. आत जंगलामध्ये वास्तव्यास असणाऱ्या संबंधित आदिवासी कुटुंबाला कल्पवृक्ष फाउंडेशनकडून तांदूळ, तूरडाळ, भाजीपाला आदी जीवन आवश्यक साहित्य देण्यात आले.