पोलीस खात्यातर्फे शहरातील जालगार गल्ली कॉर्नर येथे रस्त्यावर घालण्यात आलेले बॅरिकेड्स हटविण्याच्या मागणीवरून परिसरातील नागरिक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
बेळगाव महापालिका आणि आणि पोलीस खात्यातर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निश्चित करण्यात आलेली हॉटस्पॉट ठिकाणी सील करण्याची मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जालगार गल्ली कॉर्नर येथे बॅरिकेट्स टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. सदर बॅरिकेड्स त्याठिकाणाहून हटवावेत , अशी मागणी जालगार गल्लीसह कोतवाल गल्ली व दरबार गल्लीतील मुस्लिम बांधवांनी आज सकाळी पोलिसांकडे केली केली.
पोलिसांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन संदर्भातील नियम व आदेशांची माहिती देऊन उपस्थित नागरिकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावरून उपस्थित नागरिकांचा जमाव आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी होऊन वातावरण तापले होते.
सदर प्रकाराची माहिती मिळताच मार्केट पोलीस स्थानकाचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपस्थित जमावाला व्यवस्थित समज देऊन शांत केले. तसेच घालण्यात आलेले बॅरिकेट्स नवा आदेश येईपर्यंत काढले जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. यावेळी विश्वनाथ माळगी व यासिर जमादार या पोलीस कॉन्स्टेबल्सनी जमावाला शांत करण्यात आपल्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले. अखेर सीपीआय शिवयोगी यांनी समजावल्यानंतर बॅरिकेट्स हटवण्याची मागणी करणाऱ्या मंडळींनी तेथून काढता पाय घेतला.