देशातील प्राणघातक कोरोना विषाणू संसर्गा विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्स देखील आघाडीवर असून प्राणाची बाजी लावून ते कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु त्यांनाही संसर्ग होत असून कांही डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात जे डॉक्टर मृत्युमुखी पडले त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि सेवेत असणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी बुधवार दि. 22 एप्रिल 2020 रोजी रात्री 9 वाजता सर्व डॉक्टरांनी मेणबत्त्या लावून अभिवादन करावे, असे आवाहन भारतीय वैद्यक संघटना म्हणजेच “आयएमए”ने केले आहे.
यासाठी डॉक्टरांनी दवाखाना, हॉस्पिटल किंवा घरी ते जेथे असतील तेथे मेणबत्त्या लावाव्यात, असे आयएमएने सांगितले आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना कांही विशिष्ट समाजाचे रुग्ण डॉक्टरांवर हल्ला करणे, आरोग्य सेवक व आशा कार्यकर्त्यांना मारहाण करणे असे निंदनीय प्रकार करत आहेत.
त्याचा निषेध म्हणून गुरुवारी दि. 23 रोजी सर्व डॉक्टरांनी दंडाला काळ्या फिती बांधून काम करावे आणि हा दिवस “काळा दिन” म्हणून पाळावा, असेही भारतीय वैद्यक संघटनेने स्पष्ट केले आहे. हा काळा दिन म्हणजे “व्हाईट अलर्ट वाॅर्निंग” आहे, असेही आयएमएने नमूद केले आहे.