लॉक डाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा सपाटा रहदारी पोलिसांनी लावला असून गुरुवारी रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्या 74 वाहनांवर त्यांनी जप्तीची कारवाई केली.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. अनावश्यकपणे कोणीही रस्त्यावरून फिरू नये असे आवाहन सातत्याने केले जात आहे. तरीही अद्यापपर्यंत शहरवासीयांकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याची गंभीर दखल पोलीस खात्याने घेतली असून गेल्या चार दिवसांत एकूण 215 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
यापैकी प्रारंभी पहिल्या दिवशी 36 दुसऱ्या दिवशी 49 तिसऱ्या दिवशी 56 आणि आज गुरुवारी चौथ्या दिवशी 74 वाहने जप्त करण्यात येऊन त्यांच्या मालकांना नोटीस काढण्यात आली आहे. सध्या न्यायालय बंद असल्यामुळे संबंधित वाहनचालकांना आता त्यांची वाहने 14 एप्रिल नंतरच परत मिळणार आहेत.