रमेश जारकीहोळी यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार अशी काल खात्रीलायक बातमी होती पण बेळगाव जिल्ह्यात चार वजनदार मंत्री असून देखील जिल्ह्याचे पालकमंत्री पद जगदीश शेट्टर यांच्याकडेच कायम ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.शशिकला जोल्ले यांच्याकडे विजापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
जारकीहोळी यांना पालकमंत्रीपद मिळाले नसल्याने त्यांचे पाठीराखे नाराज झाले आहेत.उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात पालकमंत्रीपदाची चुरस होती.पण मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी या दोघांनाही बाजूला ठेवून शेट्टर यांच्याकडेच पालकमंत्री पद ठेवले आहे.
सवदी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.महेश कुमठळ्ळी यांनी त्याचा परभाव केला होता.कुमठळ्ळी यांना विजयी करण्यात जारकीहोळी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.त्यामुळे सवदी आणि जारकीहोळी यांचे संबंध मधुर नाहीत. अलीकडेच विधानपरिषदेवर गेल्याने सवदी हे पुढील सहा वर्षे आमदार राहणार आहेत.पराभूत होऊनही त्यांना उप मुख्यमंत्रीपद हाय कमांडच्या आशीर्वादामुळे मिळाले आहे.तर रमेश जारकीहोळी यांनी संमिश्र सरकार खाली खेचून भाजप सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बाजावल्यामुळे जलसंपदा सारखे वजनदार खाते जारकीहोळी यांना मिळाले आहे.
पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल अशी त्यांना खात्री होती पण येडीयुरप्पा यांनी सवदी आणि जारकीहोळी या दोघांनाही बाजूला ठेवून शेट्टर यांच्याकडेच पालकमंत्रीपद कायम ठेवून आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवले आहे.