कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य खात्याकडून विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने बेळगाव जिल्ह्यात 200 थर्मल स्क्रीनिंग मशीनद्वारे लोकांची आरोग्य तपासणी केली जात असून लवकरच थर्मल स्क्रीनिंग मशीन्सची संख्या वाढविण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात दररोज थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. ज्या लोकांमध्ये तापाची लक्षणे दिसून येत आहेत त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जात आहेत. बऱ्याच जणांचे समान तापमान दाखवत असल्यामुळे या थर्मल स्क्रीनिंगबाबत शंका उपस्थित केली जात होती. तथापि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठिकठिकाणी केले जात असलेले थर्मल स्क्रीनिंग योग्य असून अनेकांच्या शरीराचे तापमान एकसारखे असू शकते, असे आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात केले जात असलेले थर्मल स्कॅरिंग स्क्रीनिंग करण्याच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य खात्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यात 200 थर्मल स्क्रीनिंग मशीन्सद्वारे आरोग्य तपासणी केली जात आहे. यांपैकी 8 थर्मल स्क्रीनिंग मशीन्सद्वारे विविध ठिकाणी असलेल्या चेक पोस्टवर तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे 139 मशीन्स प्राथमिक आरोग्य केंद्र, 19 समुदाय आरोग्य केंद्र आणि 9 थर्मल स्क्रीनिंग मशीन्स तालुका आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त निर्जंतुकीकरण चेंबर असलेल्या ठिकाणी 12 मशीन्सद्वारे थर्मल स्क्रीनिंग सुरू आहे.