बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढून 36 वर पोहोचल्यामुळे शुक्रवारपासून शहर परिसरात “सील डाऊन” ची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्यात आल्यामुळे संपूर्ण बेळगाव शहर शुक्रवारी “कर्फ्यू” सदृश निर्मनुष्य दिसत होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच गुरुवारी 16 रोजी एकाच दिवसात जिल्ह्यातील 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 36 वर पोचली आहे. गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याने प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे. आतापर्यंत ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत आहेत त्या ठिकाणचा 3 कि. मी.चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून सील डाऊन करण्यात येत होता. मात्र आता बेळगाव शहर संपूर्ण सिल डाऊन करण्याच्या दिशेने कडक पावले उचलण्यात येत आहेत. या अनुषंगाने गुरुवारी रात्री काही भागात पोलिसांनी गस्त घालून शुक्रवारी कुठल्याही प्रकारचे व्यवहार सुरू राहणार नाहीत असे सांगितले होते.
सील डाऊनच्या अंमलबजावणीमुळे शुक्रवारी शहरातील औषधांची काही मोजकी दुकाने वगळता नुकत्याच सुरू झालेल्या रविवार पेठ मार्केटसह भाजी मार्केट, जीवनावश्यक साहित्याची दुकाने आदी सर्व व्यवहार बंद करण्यात आले. प्रमुख रस्ते बंद करण्याबरोबरच गेल्या काही दिवसात नागरिकांच्या सोयीसाठी खुले ठेवण्यात आलेले पर्यायी रस्ते देखील शुक्रवारी बॅरिकेडस् टाकून बंद करण्यात आले. सकाळपासूनच पोलिसांनी कडक पवित्रा घेऊन रस्त्यावर दूध, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास बाहेर पडलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी पिटाळून लावले. यासाठी बऱ्याच जणांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही मिळाला. सील डाऊनची कडक अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे शुक्रवारी सकाळपासून बेळगाव शहर निर्मनुष्य बनले होते.
दरम्यान, बेळगाव शहराच्या आजूबाजूला असणारा कोरोना विषाणू जर एकदा का शहरात शिरला आणि विशेषत: बाजारपेठेतील एखाद्याला लागण झाल्याचे समोर आले तर परिस्थिती अधिकच गंभीर होणार आहे. त्यामुळे पुढील किमान तीन दिवस शहरात कर्फ्यू सदृश्य स्थिती राहील असे संकेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोणत्याही स्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी आता कठोर पावले उचलण्यात येत आहेत.