बेळगाव जिल्ह्यात पुन्हा “कोरोना”चा स्फोट झाला असून गेल्या 16 एप्रिलनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आज गुरुवार दि. 30 एप्रिल 2020 रोजी मोठ्या प्रमाणात (14) कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते हादरून गेले असून आणखी सतर्क बनले आहे. बेळगावसह राज्यात गुरुवारी नव्याने 22 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 557 झाल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात याआधी गेल्या गुरुवार दि. 16 एप्रिल रोजी एकाच दिवशी तब्बल 17 कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसानंतर आज गुरुवार दि. 30 एप्रिल 2020 रोजी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा स्फोट झाला असून एकूण 14 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत मागील वेळी “बेळगाव लाईव्ह”ने सर्वप्रथम 17 करोना बाधित यांची ब्रेकिंग न्यूज दिली होती याबद्दल त्यावेळी खुद्द आमदार अॅड. अनिल बेनके यांनी बेळगाव लाईव्हची प्रशंसा केली होती. जिल्ह्यामध्ये आज गुरुवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी येथे गुरुवारी नव्याने 11 आणि संकेश्वर (ता. हुक्केरी) येथे 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हिरे बागेवाडी येथील 11 रुग्णांमध्ये 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे संकेश्वर येथे आढळून आलेल्या 3 रुग्णांमध्ये अनुक्रमे 9 आणि 8 वर्षीय बालक – बालिकेसह 75 वर्षीय वृद्धीचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यात नव्याने आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण कसे संसर्गित झाले त्याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे. हिरेबागेवाडी येथील पी – 539 क्रमांकाच्या 24 वर्षीय महिलेला पी – 469, 483 व 484 या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचप्रमाणे पी – 540 क्रमांकाचा 27 वर्षे पुरुष हा पी- 483 क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाला आहे. उर्वरित कोरोना बाधितांचे अनुक्रमे रुग्ण क्रमांक, लिंग, वय आणि ज्यांच्या संपर्कामुळे संसर्ग झाला त्यांचे क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
पी – 543 महिला (वय 24) संपर्क पी – 486. पी – 544 पुरुष (वय 18) संपर्क पी – 496. पी – 545 महिला (वय 48) संपर्क पी – 494. पी – 546 पुरुष (वय 50) संपर्क पी – 483. पी – 547 महिला (वय 27) संपर्क पी – 496 व 483. पी – 548 पुरुष (वय 43) संपर्क पी – 484. पी – 549 पुरुष (वय 16) संपर्क पी – 486. पी – 550 महिला (वय 36) संपर्क पी – 486. पी – 552 पुरुष (वय 36), संपर्क पी – 496. संकेश्वर येथील पी – 541 नऊ वर्षीय बालक संपर्क पी – 293. पी – 542 महिला (वय 76), संपर्क पी – 293. पी – 541 आठ वर्षीय बालिका संपर्क पी – 293.
*राज्यातील कोरोनाग्रस्त झाले 557*
दरम्यान, कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज गुरुवार दि 30 एप्रिल 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी नव्याने 22 रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 557 इतकी झाली आहे. यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला असून 223 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 29 एप्रिल सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार दि. 30 एप्रिल 2020 दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात 22 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यापैकी सर्वाधिक 14 रुग्ण बेळगाव जिल्ह्यातील आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 14 कोरोना बाधित रुग्णांमध्ये हिरेबागेवाडी येथील 11 आणि संकेश्वर येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. बेळगाव जिल्हा व्यतिरिक्त राज्यात बेंगलोर शहरात 3, विजयपुरा येथे 2 तर मंगळूर, तुमकूर व दावणगिरी येथे प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे.