प्राणघातक कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास शनिवारपर्यंत 800 स्वयंसेवकांनी प्रतिसाद दिला आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनाला मदत करण्यासाठी या सर्व स्वयंसेवकांनी आपली नांवे ऑनलाइन रीतसर नोंदविली आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून याकरिता मनुष्यबळाची कमतरता भासू नये यासाठी विविध क्षेत्रातील लोकांना स्वयंसेवक होण्यासाठी गेल्या 25 मार्च रोजी जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते. यासाठी ऑनलाईन नोंदणी व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स यांच्यासह योगा शिक्षक, फार्मासिस्ट, क्रीडाशिक्षक, टेलीकॉलर, तंत्रज्ञ आदींना मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारपर्यंत 800 स्वयंसेवकांनी आपली ऑनलाईन नोंदणी केली असून यामध्ये तब्बल 35 खाजगी डॉक्टरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 19 नर्सिंग स्टाफ आणि लॅब टेक्निशियन्सनी स्वयंसेवक म्हणून नोंद केली आहे.
जिल्ह्यातील 10 मेडिकल दुकान मालक स्वयंसेवक होण्यास पुढे सरसावले असून 125 वाहनचालकांनी तातडीच्या सेवेत हजर राहण्यासाठी नांव नोंदणी केली आहे. अन्य 38 जणांनी आपली वाहने यापूर्वीच तातडीच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिली आहेत. याखेरीज प्रशासकीय सेवेसह इतर क्षेत्रात जिल्हा प्रशासनाला मदत करण्यासाठी 545 जण पुढे आले आहेत. प्रशासनाने या सर्वांची दखल घेतली असून सर्वांना वैयक्तिक संदेश पाठवत आणीबाणीच्या काळात सेवेवर बोलविण्याचे कळविले आहे. जिल्हा प्रशासनाच्या www.belagavi.nic.in या संकेत स्थळावर स्वयंसेवकांसाठी नोंदणी सुरु आहे.