भारतासह संपूर्ण जगात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगावातील यशवंत कास्टिंग या उद्योग समूहाने अद्ययावत “डिसइन्फेक्शन चेंबर” अर्थात निर्जंतुकीकरण कोठडीची निर्मिती केली आहे. याची प्रशासनाने दखल घेतली असून संबंधित डीसइन्फेक्शन चेंबरची लवकरच पाहणी केली जाणार आहे.
बेळगावातील यशवंत कास्टिंग या कंपनीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास निर्जंतुकीकरण कोठडी (डीसइन्फेक्शन चेंबर) निर्माण केली आहे. पॉली कार्बोनेट पॅनल्स आणि शीट्सने बनविण्यात आलेल्या या पारदर्शक कोठडीला दोन दरवाजे असून प्रवेशद्वारावर सॅनीटायझरची बाटली ठेवण्यात आली आहे.
त्याने हात धुऊन कोठडीत प्रवेश केल्यानंतर अॅटोमॅटिक सेन्सरद्वारे कोठडीतील निर्जंतुकीकरण प्रणाली कार्यान्वित होते. ही निर्जंतुकीकरण प्रक्रिया संबंधित व्यक्ती कोठडीतून बाहेर पडेपर्यंत सुरू राहते, त्यानंतर अॅटोमॅटिक सेन्सरद्वारे ती बंद होते. सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सदर “डीसइन्फेक्शन चेंबर” अतिशय प्रभावी ठरणार असल्याचा दावा यशवंत कास्टिंगच्या तज्ञांनी केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी डीसइन्फेक्शन चेंबरचे प्रात्यक्षिकही सादर करून ते सोशल मीडियावर अपलोड केले आहे.
दरम्यान, यासंदर्भात पत्रकारांनी शनिवारी जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी यशवंत कास्टिंग यांच्याशी संपर्क साधून संबंधित डीसइन्फेक्शन चेंबरची माहिती मागून घेण्याबरोबरच प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असे आश्वासन दिले.