सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिका व जिल्हा प्रशासनातर्फे शहरात खरेदीसाठी ज्या ठिकाणी अधिक गर्दी असते अशा चार ठिकाणी “डिसइन्फेक्टंट टनेल”ची निर्मिती केली जाणार आहे. येत्या दोन दिवसात यापैकी पहिल्या टनेलचे निर्मिती केली जाणार आहे.
बेळगाव महापालिका व जिल्हा प्रशासनातर्फे शहरात चार ठिकाणी डिसइन्फेक्टंट टनेलची निर्मिती केली जाणार आहे. महापालिकेने टनेलसाठी चार जागा निश्चित केल्या असल्या तरी त्यांची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या टनेलमध्ये सॅनीटायझर किंवा जंतुनाशक यांची फवारणीद्वारे नागरिकांना निर्जंतुक केले जाणार आहे. लॉक डाऊनच्या काळात शहरात अन्नधान्य, औषधे किंवा भाजीपाला खरेदीसाठी नागरिक ठराविक ठिकाणी गर्दी करीत आहेत. या सर्वांना सॅनीटायझर उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. तसेच तिथे सामाजिक अंतर तत्त्वाचे पालन करणेही शक्य होत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी डिसइन्फेक्टंट टनेल या पर्यायाचा वापर केला जाणार आहे. तामिळनाडू राज्यातील एका शहरात भाजी मार्केटमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानंतर कर्नाटकातील गौरिबिदानुर गावातही त्याचे अनुकरण झाले असून तेथे देखील हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता बेळगावातही त्याचे अनुकरण केले जाणार आहे.
महापालिका प्रशासक व जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी आणि मनपा आयुक्त के. एच. जगदीश यांच्याशी महापालिकेच्या अभियंत्यांनी संदर्भात चर्चा केली आहे. या उभयतांनी परवानगी दिल्यामुळे पालिकेचे अभियंते या डिसइन्फेक्टंट टनेल निर्मितीच्या कामाला लागले आहेत. परिणामी येत्या दोन दिवसात पहिल्या डिसइन्फेक्टंट टनेलची निर्मिती केली जाणार आहे. बेळगाव महापालिकेने शहरातील बस थांबे व रस्त्यांचे निर्जंतुकीकरण किती केले आहे. पण आता या डिसइन्फेक्टंट टनेलव्दारे खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे देखील निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.