आदर्शनगर वडगाव येथील श्रीराम कॉलनी या वसाहतीमध्ये गेल्या दीड – दोन महिन्यापासून धोकादायक वैद्यकीय कचरा टाकण्यात येत असून महापालिकेने या प्रकाराला त्वरित आळा घालावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
आदर्शनगर वडगाव येथील श्रीराम कॉलनीतील रमेश मारुती पाटील यांच्या घराच्या परिसरामध्ये अज्ञातांकडून वैद्यकीय उपचारासाठी वापरला जाणारा कापूस, हॅन्ड ग्लोज, डायपर्स आदी वैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.
भटक्या कुत्र्याकडून हा वैद्यकीय कचरा आसपासच्या घराघरापर्यंत पसरविला जात आहे. या ठिकाणच्या झाडाझुडपांसह गटारीमध्ये वैद्यकीय कचरा आणि त्याच्या पिशव्या टाकण्यात येत आहेत. यामुळे श्रीराम कॉलनी मधील संबंधित भागात अस्वच्छता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
धोकादायक वैद्यकीय कचरा टाकण्याच्या या प्रकारासंदर्भात यापूर्वी वेळोवेळी संबंधितांकडे तक्रार करून देखील अद्याप त्याची दखल घेण्यात आलेले नाही. सध्या लाॅक डाऊनची संधी साधून येथील वैद्यकीय कचरा टाकण्याच्या प्रकारात अधिकच वाढ झाली आहे. तेंव्हा महापालिकेच्या आरोग्य खात्याने याकडे त्वरित गांभीर्याने लक्ष देऊन सदर प्रकाराला पायबंद घालावा, अशी रमेश पाटील यांच्यासह श्रीराम कॉलनीतील नागरिकांची मागणी आहे.