आपली पाळीव जनावरे रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्यांनी यापुढे तसे केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची जनावरे थेट गोशाळेत धाडली जातील, असा इशारा कर्नाटक पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिला आहे.
लोक डाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे जागोजागी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. नरगुंदकर भावे चौक येथे सोमवारी रात्री अशाच प्रकारे टाकण्यात आलेल्या वैद्यकिय कचर्यात मोकाट कुत्री आणि गाईचा कळप अन्न शोधताना निदर्शनास आला. शहरातील मोकाट जनावरांपैकी कांही जनावरे खाजगी मालकीची आहेत. संबंधित मालक दूध काढण्याचे काम झाले की आपल्या जनावरांना शहरात मोकाट सोडून देत असतात.
सोमवारी रात्री वैद्यकीय कचऱ्यात वावरणारी ही जनावरे पाहून डॉ. सोनाली सरनोबत यांनी तीव्र खेद व्यक्त केला. कारण अपायकारक वैद्यकीय कचरा जनावरांनी खाल्ल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते. सदर प्रकाराची डॉ. सरनोबत यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच संबंधित जनावर मालकांनी आपापल्या जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर शहरात मोकाट फिरणारी त्यांची जनावरे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गोशाळेत धाडली जातील असा इशाराही डॉ. सरनोबत यांनी दिला आहे.