बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित आणि पर्यायाने संशयित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराच्या प्रवेशद्वाराच्या मार्गावर असलेल्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या (आयसीएमआर) इमारतीमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केली जाणार असून याला आरोग्याधिकारी डाॅ. संजय डुमगोळ यांनी दुजोरा दिला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू तपासणीच्या राज्यात सध्या 11 प्रयोगशाळा आहेत. प्रारंभी यापैकी शिमोगा येथील प्रयोगशाळेत बेळगाव येथील संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. हे गैरसोयीचे होत असल्यामुळे उत्तर कर्नाटकात कोरोना तपासणी प्रयोगशाळा हवी अशी मागणी त्यावेळी झाली होती. तसेच बेळगाव येथे प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
तथापि ऐनवेळी बेळगाव येवजी हुबळी येथे प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. आता बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या ती 36 इतकी झाली आहे. पर्यायाने काॅरन्टाईन करण्यात आलेल्यांची संख्या देखील वाढली आहे. या सर्वांच्या कोरोना तपासणीसाठी बेळगावात स्वतंत्र प्रयोगशाळा अनिवार्य झाली आहे. हे ध्यानात घेऊन बेळगावातील प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ती आयसीएमआर बेळगाव शाखेच्या इमारतीत सुरू करण्याचे निश्चित झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वाराच्या मार्गावर म्हणजे केएलई हाॅस्पिटल रोडवर आयसीएमआर संस्थेची इमारत आहे.
सध्या कोरोना तपासणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील संशयितांच्या घशातील स्वॅबचे नमुने हुबळी व अन्य 10 ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. मात्र बेळगावात कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्यास स्वॅबचे नमुने अन्यत्र पाठवावे लागणार नाहीत. शिवाय त्यांचा अहवालही तात्काळ उपलब्ध होणार आहे. फक्त आता प्रशासनाकडून प्रयोगशाळेसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.