कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे शिक्षण क्षेत्राचे देखील नुकसान होत आहे. तथापि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या हेतूने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून एसएसएलसी आणि पीयूसी अभ्यासक्रमाचे ऑनलाईन वर्ग घेण्याचा विचार सरकार करत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. तसेच सर्व प्रकारच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासही थांबला आहे. अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.
या अनुषंगाने एसएसएलसी आणि पीयूसीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाचे शिक्षक किंवा प्राध्यापक आपल्या घरी आपापल्या विषयाचा वर्ग घेऊन तो रेकॉर्ड करतील आणि रेकॉर्ड केलेला विषय अपलोड करू शकतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि अभ्यासक्रमदेखील सुरळीत होणार आहे.
दरम्यान, तांत्रिक शिक्षण संस्थांनी देखील शिक्षक व प्राध्यापकांच्या टंचाईवर मात करत ऑनलाईनचा पर्याय स्वीकारला आहे. तेंव्हा एसएसएलसी आणि पीयूसी शिक्षकांनी ऑनलाईन वर्गाची तयारी सुरू करावी म्हणजे हे वर्ग लवकरात लवकर सुरू करता येतील, असे आवाहन शिक्षण खात्याने शिक्षकांना केले आहे.