आजकाल जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी अनेकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतात, तथापि बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी सोमवारी पहिल्यांदाच “फेसबुक लाईव्ह”च्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे ग्राम विकासाधिकारी, टास्क फोर्सचे सदस्य आणि लोकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद लाभला
जिल्ह्यात कांही ठिकाणी “कोरोना”चे रुग्ण सापडल्यामुळे लोकांनी घाबरून न जाता सरकारने केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. ग्राम विकास अधिकारी आणि ग्राम कृती दलाने (टास्क फोर्स) प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याबरोबरच नागरिक अनावश्यक घराबाहेर पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जि. पं. सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी फेसबुक लाईव्हव्दारे केले आहे.
ते पुढे म्हणाले की, कोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोक घराबाहेर पडणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच गावाचा परिसर स्वच्छ ठेवणे, फॉगिंगद्वारे निर्जंतुकीकरण करणे, गावात केमिकल स्प्रे करणे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे याबाबतीत विशेष करून वयोवृद्ध मंडळी आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे, मास्कचा वापर व सामाजिक अंतराच्या सूचनेसह सरकारच्या अन्य सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत जनजागृती करणे आदी कामे ग्राम विकास अधिकारी आणि ग्राम कृती दलाने प्रभावीरीत्या केली पाहिजेत. सध्या जिल्ह्यातील बेळगुंदी, पिरनवाडी, येळ्ळूर आणि हिरेबागेवाडी या ग्रामपंचायत हद्दीत कोरण्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चारही ग्रामपंचायती बेळगाव तालुक्यातील असल्यामुळे या पंचायतींना निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांनी लोक घरातून बाहेर पडणार नाही याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रत्येकाच्या घराघरापर्यंत अत्यावश्यक सेवा देण्यात याव्यात त्यासाठी ग्राम कृतीदल आणि पंचायत अधिकाऱ्यांनी रूपरेषा आखावी, असे सीईओ डॉ. राजेंद्र यांनी सांगितले.
कोरोनाला घाबरून जाऊ नका. आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू हे लोकांना पटवून द्या. इन्स्टिट्यून्शल काॅरन्टाईनबाबत लोकांच्या मनात असलेली अवास्तव भीती दूर करा. होम काॅरन्टाईन केलेले रुग्ण घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्या. एखादा रुग्ण सतत घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत असल्यास त्यासंदर्भात तात्काळ प्रशासनाला माहिती द्या. ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या व्यक्तीची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्या. कोणत्याही किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करू नका आदी सूचना डॉ. राजेंद्र यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ग्राम विकास अधिकारी आणि ग्राम कृती दलाच्या सदस्यांना केल्या.
जिल्ह्यात इतर ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये कोरोनाची लागण झाली नसली तरी अनेक ठिकाणी अफवा पसरत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात यावी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात यावे, असे आवाहन देखील सीईओ डाॅ. राजेंद्र के. व्ही. यांनी केले.