दिल्ली येथील वादग्रस्त मरकज या धर्मसभेला जाऊन आल्यानंतर आपली कोरोना तपासणी करून न घेता लपून बसलेल्या हिरेबागेवाडी येथील जमातीच्या एका युवकासह अन्य 6 जणांवर हिरेबागेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरलेल्या दिल्ली येथील तबलीग मरकज या धर्मसभेला उपस्थित राहून गावी परत आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना तपासणी करून घ्यावी, असा आदेश शासनाने काढला आहे. त्याचप्रमाणे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तबलीग मरकजला जाऊन आलेला हिरेबागेवाडी येथील तबलीग जमातीचा एक युवक अद्याप आपली वैद्यकीय तपासणी करून न घेता लपून बसला असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटच्या टास्क फोर्सने हिरेबागेवाडी पोलिसांना दिली. सदर माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून संबंधित युवकाला तात्काळ ताब्यात घेतले, तसेच त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस तपासादरम्यान हिरेबागेवाडी गावातील तबलीग जमातीचा कार्यदर्शी आणि कांही नेत्यांनी पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली. परिणामी संबंधित युवकाला लपून बसण्यास मदत केल्याच्या आरोपावरून अन्य सहा जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरेबागेवाडी गावात यापूर्वीच जमातीच्या एका कोरोना संशयित युवकाला वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर युवकाच्या संपर्कात त्याचे आई-वडील आणि भाऊ आला असल्यामुळे या सर्वांची कोरोना तपासणी केली जात आहे. आता लपून बसलेल्या या दुसऱ्या युवकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तबलीग मरकजला जाऊन आलेल्यांनी स्वतःहून कोरोना तपासणीस हजर रहावे असे आवाहन केले आहे. उपरोक्त प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.