संपूर्ण देशात कोरोनाची धास्ती असताना बेळगावात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. या अनुषंगाने संपूर्ण बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अफवांचे पीक पसरले आहे. असे असताना एका ग्रामपंचायत सदस्याने काही ग्रामपंचायत सदस्यांचे नाव बदनाम करून अनेक अफवा पसरविल्याने मोठी खळबळ माजली आहे.
किणये ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात या अफवेमुळे बराच गोंधळ माजला होता. संबंधित सदस्याने संपूर्ण तालुक्यात अनेकांचे नावे बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही सदस्यांनी त्याला चांगला जाब विचारला असून यापुढे असे घडल्यास गय केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
किणये ग्रामपंचायत मध्ये काही दिवसांपूर्वी पार्टी करण्यात आली होती मात्र याला बरेच दिवस उलटले होते तरी काही ही अंतर्गत राग ठेवून कर्ले येथील एका ग्रामपंचायत सदस्याने अनेकांची नावे बदनाम केल्याचा घाट घातला होता. याचबरोबर त्यांच्या घरी अशा कार्यकर्ते डॉक्टर्स व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
ही अफवा संपूर्ण तालुक्यात वार्यासारखी पसरली. मात्र संबंधितांनी त्या ग्रामपंचायत सदस्याला बोलून बैठक केली आणि या बैठकीत त्याने आपली चूक कबूल केली आहे. यामुळे या प्रकरणावर पडदा पडला असला तरी संबंधित सदस्याच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र इतरांना बसला आहे. त्यामुळे यापुढे अशा अफवा पसरविणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे.