जीवनावश्यक साहित्य, अल्पोपहार, भोजन जे कांही आहे ते आमच्याकडे आणून द्या आम्ही ते तुम्हाला हव्या त्या ठिकाणच्या गोरगरीबांनामध्ये वाटू असे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले असले तरी या प्रकाराला अनेकांचा आक्षेप आहे. सेवाभावी संस्था अथवा दानशूर नागरिकांनी महापालिकेकडे जाण्याऐवजी पालिकेनेच त्यांच्याकडे जाऊन जीवनावश्यक साहित्य, भोजन आदी आपल्या ताब्यात घ्याव्यात आणि त्याचे वाटप करावे, अशी मागणी केली जात आहे.
सध्याच्या लॉक डाऊनच्या कालावधीत सेवाभावी संस्था आणि दानशूर नागरिकांनी गोरगरिबांपर्यंत जाऊन जीवनावश्यक साहित्य, अल्पोपहार अथवा भोजनाचे वाटप करण्याऐवजी त्यांनी ते महापालिकेकडे आणून द्यावे म्हणजे महापालिका संबंधितांच्या इच्छेप्रमाणे त्याचे वाटप करेल, असा फतवा काढण्यात आला आहे. तथापि हा फतवा सदोष असून तो बदलण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. कारण टिळकवाडीतील एखाद्या सेवाभावी संघ -संस्थेला उद्यमबाग परिसरातील गोरगरिबांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करायचे असेल तर उद्यमबाग अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असल्याने त्या संस्थेला ते सहज शक्य होऊ शकते. मात्र महापालिकेच्या फतव्यानुसार काम करायचे झाल्यास टिळकवाडी येथील संबंधित संस्थेला जीवनावश्यक साहित्य घेऊन पोलीस बंदोबस्तातून मार्ग काढत 6 – 7 किलोमीटरवर असलेल्या महापालिका कार्यालयापर्यंत जावे लागणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ते जीवनावश्यक साहित्य घेऊन पुन्हा टिळकवाडी मार्गेच 7 – 8 की. मी. अंतर कापून उद्यमबागला जावे लागणार आहे. टिळकवाडी प्रमाणे अन्य उपनगरांच्या बाबतीतही हाच प्रकार घडू शकतो.
तेंव्हा महापालिकेने आपण काढलेल्या गोंधळ वाढविणाऱ्या फतव्याचा फेरविचार करावा तसेच सेवाभावी संस्था व नागरिकांकडून महापालिका कार्यालयात गोरगरिबांसाठीचे जीवनावश्यक साहित्य अथवा भोजन वगैरे मागवण्याऐवजी या कामासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त करावीत. ही पथके टोल फ्री नंबरवर जे कोण शहरातील गोरगरीबांमध्ये जीवनावश्यक साहित्य आदींचे वाटप करण्याची इच्छा व्यक्त करतील त्यांच्यापर्यंत जाऊन संबंधित वस्तू ताब्यात घेतील. त्याची पोचपावती त्या संघ – संस्था किंवा व्यक्तीस देतील आणि संबंधितांच्या इच्छेनुसार गोरगरिबांमध्ये त्यांचे वाटप करतील. हा पर्याय गोंधळ न वाढविणारा अत्यंत सुटसुटीत व योग्य असून महापालिकेने याची अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी सेवाभावी संस्था व नागरिकांकडून केली जात आहे.