शहरातील आझाद गल्ली येथे एक कोरोना बाधित महिला आढळून आल्यामुळे हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याबरोबरच त्याच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा शिरकाव आता शहराच्या मध्यवर्ती भागात झाला आहे. आझाद गल्लीतील एका 25 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे मंगळवारी सायंकाळी हा परिसर सील डाऊन करून येथील 200 मीटरचा परिघ “कंटेनमेंट झोन” म्हणून घोषित करण्यात आला आहे. आझाद गल्ली कंटेनमेंट झोनची (निर्बंधित क्षेत्र) व्याप्ती पूर्वेकडे जुन्या पी. बी. रोडपर्यंत, पश्चिमेकडे भातकांडे गल्ली गोपाळ प्लायवूडपर्यंत, उत्तरेकडे खडेबाजार रोडपर्यंत आणि दक्षिणेकडे बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक रविवार पेठ रोडपर्यंत असणार आहे. या कंटेनमेंट झोन बाहेरील 5 कि. मी.चा परिसर “बफर झोन” म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
या बफर झोनची व्याप्ती पूर्वेकडे भारत पेट्रोलियम पंप बसवन कुडचीपर्यंत, पश्चिमेकडे बेनकनहळ्ळी क्रांतीनगरपर्यंत, उत्तरेकडे सत्य साईबाबा मंदिर यमुनापूरपर्यंत आणि दक्षिणेकडे केएलई सेंटीनरी चॅरिटेबल हॉस्पिटल रोडपर्यंत असणार आहे. महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच. हे आझादनगर कंटेनमेंट झोनचे ओव्हर ऑल इन्चार्ज असणार आहेत.
शहरातील कॅम्प, अझमनगर व अमननगर या निर्बंधित क्षेत्रांमागोमाग आता आझाद गल्ली आणि परिसरातील रहिवाशांना देखील कडक सील डाऊनला सामोरे जावे लागणार आहे. येथील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत. सध्या या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत कॅम्पमध्ये कोरोनाचे 4 तर अझमनगर, अमननगर व आझाद गल्ली येथे प्रत्येकी 1 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनावरील दडपण वाढले आहे.