सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरन्टाईन विभागात कोरोना संशयित तबलीग मरकज रुग्णांकडून थुंकण्याचा जो प्रकार घडला. याची गंभीर दखल आपण घेतली असून यासंदर्भात संबंधित रुग्णांना योग्य ती समज देण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण बीम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी दिली
सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरन्टाईन विभागात कोरोना संशयित तबलीग मरकज रुग्णांकडून थुंकण्याच्या प्रकाराबद्दल रविवारी पत्रकारांनी छेडले असता डॉ. विनय दास्तीकोप यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले. सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरन्टाईन विभागातील कोरोना संशयित तबलीग मरकज रुग्ण करत असलेला खुलेआम थुंकण्याचा प्रकार तेथे सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिकांनी माझ्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मी तात्काळ त्याची दखल घेतली.
स्वतः कोरन्टाईन विभागात जाऊन संबंधित रुग्णांना धारेवर धरून त्यांच्या अशा वर्तनामुळे इतरांना त्याचा त्रास होत असल्याची जाणीव त्यांना करून दिली. तसेच वॉर्डमध्ये थुंकू नका थुंकायचे असेल तर बाथरूममध्ये जाऊन थुंका, अशी सक्त सूचना त्यांना केली असल्याचे डॉ दास्तीकोप यांनी सांगितले.
थुंकण्याचा प्रकार करणाऱ्या तबलीग मरकज रुग्णाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्णांना कोरोना बाधित रुग्णांसमवेत एकत्र ठेवले जाते, वैद्यकीय तपासणी केली जात नाही आदी आरोप केले आहेत. याकडे लक्ष वेधले असता डॉ. विनय दास्तीकोप यांनी या स्पष्ट आरोपाचा इन्कार केला. कोरोना बाधित रुग्ण आणि संशयित कोरन्टाईन असलेले रुग्ण यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची वेळच्या वेळी वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच व्यवस्थित देखभाल ही केली जात आहे. यासाठी बीम्सने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देखील दिलेले आहे असे सांगून मी स्वतः या सर्व यंत्रणेवर जातीने लक्ष ठेवून असताना संबंधित रुग्ण खोटी माहिती का देत आहे? देव जाणे असे डॉ दोस्तीकोप म्हणाले.