आझाद गल्लीचा 200 मीटर परीघ म्हणजे ओल्ड पी. बी. रोड, कसाई गल्ली, खडे बाजार, भेंडी बाजार,अर्धी पांगुळगल्ली, भातकांडे गल्ली, रविवार पेठ कलमठ रोड, फोर्ट रोड असा चारी बाजूंचा भाग निर्बंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.आझाद गल्लीतील महिला कोरोना पोजीटिव्ह झाल्यानं शहरातील बाजार पेठ असलेला मध्यवर्ती भाग आजपासून कंटेमेंट झोन झाला आहे.
मुख्यतः रविवारपेठ ही जिल्ह्यातील घाऊक बाजारपेठ आहे. आता ती निर्बंधित क्षेत्रात आली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत रविवार पेठ बंद रहाणार यात दुमत नाही.
बेळगाव Live ने यापूर्वी आपल्या बातम्यांतुन सुचवल्या प्रमाणे बेळगावच्या चारी कोपऱ्यात घाउक बाजारपेठेचे विकेंद्रीकरण केले असते, तर आता येणाऱ्या अभूतपूर्व संकटाला बगल देता आली असती. शहर व जिल्ह्यातील सर्व किरकोळ किरणामाल व्यावसायिक रविवार पेठेतून खरेदी करत असल्याने आता त्यांना माल मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे बेळगाव आणि शहर परिसरात एक प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची कोंडी होण्याची शक्यता आहे. जर यापूर्वीच चार वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती घाऊक बाजारपेठेची उभारणी केली असती तर वितरण व्यवस्थेत कोणताही गोंधळ निर्माण झाला नसता.
रविवार पेठच्या होलसेल व्यापाऱ्यांचा माल दुकानात व गोडावून मध्ये अडकलेला आहे. व्यापारासाठी लागणारे वजन, मापे देखील दुकानात अडकली आहेत. त्यांचे भांडवल देखील गुंतुन पडले आहे. त्यातच कोरोनाग्रस्त भागातील माल बाहेर काढणे चुकीचं होणार आहे. अश्यावेळी व्यापाऱ्यांची अभूतपूर्व कोंडी झाली आहे.माल व भांडवल दुकानात अडकून पडलेले असताना नवीन वेगळा माल मागवण्यासाठीची होणारी भांडवलाची पत कोंडी. अश्यावेळी आता जर चार ठिकाणी व्यापारी झोन निर्माण करायचे असतील तर प्रशासनाने या व्यापाऱ्यांना भांडवल पुरवठा केला पाहिजे.
ही व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करणे खूप गरजेचे आहे अन्यथा आजवर पर्यंत बेळगावकरांचे जीवनावश्यक वस्तूंच्या दृष्टिकोनातून सुरळीत चाललेले जनजीवन, जीवनावश्यक वस्तूंच्या अपुऱ्या पुरवठयामुळे विस्कळीत व्हायची शक्यता आहे.उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी सुचवल्या प्रमाणे होलसेल किराणा मार्केट शहराच्या चारी कोपऱ्यात सुरू करण्याची गरज होती.