बेळगावच्या न्यायालयीन इतिहासातील पहिली आणि देशातील दुसरी ऑनलाइन न्यायालयीन सुनावणी गुरुवारी दुपारी बेळगाव येथील 8व्या आणि 6व्या जेएमएफसी न्यायालयासमोर होऊन आरोपीना जामीन मंजूर झाला. लॉक डाऊन काळात जनता सर्वच जण घरी बसले असताना कोर्टाचे कामकाज देखील ऑनलाइन खटल्यात व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे झाले आहे.
कोरोना विषाणु प्रादुर्भाव यांच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लाॅक डाऊन मुळे राज्यातील सर्व न्यायालय बंद आहेत. यासाठी न्यायालयीन खटले ऑनलाईन चालविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने बेळगाव येथील 8व्या आणि 6व्या जेएमएफसी न्यायालयात अनुक्रमे न्यायाधीश भाग्यलक्ष्मी व न्यायाधीश विनय कुंदापूर यांच्यासमोर आज गुरुवारी दुपारी दोन फौजदारी खटल्याची सुनावणी झाली. विशेष म्हणजे यावेळी फिर्यादी आणि आरोपीच्या वकिलांनी घरबसल्या न्यायाधीशांसमोर आपापली बाजू मांडत युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही खटल्यातील आरोपींना न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने ज्येष्ठ वकील ॲड. एम. एम. शेख आणि ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी काम पाहिले.
बेळगाव येथील 8व्या आणि 6व्या जेएमएफसी आज गुरुवारी दुपारी दोन फौजदारी खटल्याची सुनावणी झाली. याप्रसंगी ई – फाइलिंग ऑनलाईन झाले. त्यानंतर खटल्याचे कामकाज झूम ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये न्यायाधीशांसह अॅड. एम एम शेख, अॅड. हर्षवर्धन पाटील आणि सरकारी वकिलांनी भाग घेतला होता. बेळगाव जिल्हा न्यायालयातील कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख अरुण डुमरकी यांच्या मदतीने हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यशस्वी झाले.
दरम्यान, आधुनिक संगणकीय ऑनलाइन प्रणालीचा वापर करून अशा पद्धतीने एखाद्या खटल्याची सुनावणी होण्याची बेळगाव न्यायालयीन इतिहासात ही पहिलीच घटना आहे. त्याचप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार आजच्या दिवसात देशभरात ज्या ऑनलाइन न्यायालयीन खटल्यांची सुनावणी झाली त्यामध्ये बेळगावचा दुसरा क्रमांक लागतो. बेळगाव न्यायालयात ऑनलाइन पद्धतीने झालेल्या खटल्याच्या सुनावणीची ही घटना बेळगावच्या न्यायालयीन इतिहासात मैलाचा दगड ठरणारी आहे.