दारू मिळत नसल्याने शोचनीय अवस्था झालेल्या तळीरामांची सध्या दारुसाठी वणवण भटकंती सुरू आहे. बेळगावातील कांही तळीरामांनी तर दारुसाठी चक्क खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशात धडक मारली आहे. अशाच चौघा तळीरामांनी वेशांतर करून दारू मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न गावकरी व कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. तसेच हातपाय बांधून पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी दिल्यामुळे त्या तळीरामांची पळताभुई थोडी झाल्याची घटना गोल्याळी (ता.खानापूर) येथे शनिवारी रात्री घडली.
लॉक डाऊनमुळे गेल्या जवळपास महिन्याभरापासून दारूबंदी लागू झाली आहे. त्यामुळे बहुतांश मद्यपी मंडळींकडील स्टॉक केलेला दारूचा साठाही समाप्त झाला आहे. परिणामी लॉक डाऊनमुळे दारू मिळत नसल्याने मद्यपी लोकांची अर्थात तळीरामांची शोचनीय अवस्था झाली आहे. दारुसाठी कांहीही करण्यास तयार असणाऱ्या या मंडळींकडून बेळगाव शहरासह राज्यात ठीकठिकाणी चक्क दारूची दुकाने फोडण्याचे प्रकार घडले आहेत. हे धाडस सर्वांना जमत नाही त्यामुळे बहुतांश तळीराम सध्या दारुसाठी वणवण भटकंती करताना दिसत आहेत. भारतीय बनावटीची विदेशी दारू मिळणे दुर्लभ असल्यामुळे ही मंडळी डोंगराळ तसेच जंगल प्रदेशातील गावठी दारूचा शोध घेताना दिसत आहेत.
गोल्याळी हे गाव खानापूर तालुक्याच्या जंगल प्रदेशात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गोल्याळी गावामध्ये देखील परगावच्या लोकांना प्रवेश बंदी आहे. यासाठी गावकऱ्यांनी स्वतःची अशी सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. या गावात शनिवारी रात्री खाकी पोषाख घातलेले चौघेजण आले, त्यावेळी गावातील कार्यकर्त्यांनी त्यांना वेशीतच अडवून चौकशी केली. त्यावेळी संबंधित चौघा जणांनी आपण सरकारी नोकर असून गावात जंतुनाशक फवारणी करण्यास आलो आहोत अशी बतावणी केली. यावेळी त्यांच्यापैकी एकाने कार्यकर्त्यांकडे दारू बाबत मोघम चौकशी केली. परिणामी संशय आल्याने गावातील कार्यकर्त्यांनी जंतुनाशक औषध फवारणी करायला आला असाल तर मग दारू कशाला पाहिजे ?असा सवाल करून त्या चौघांना धारेवर धरले.
दरम्यान गावकरी देखील त्या ठिकाणी जमा झाले. चौकशीअंती संबंधित चौघेजण बेळगावहून दारूच्या शोधार्थ गोल्याळी येथे आल्याचे स्पष्ट होताच संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना बांधून घालून पोलिसात देण्याचा निर्णय घेतला. तेंव्हा त्या चौघा तळीरामांनी गयावया करत ग्रामस्थांच्या हातापाया पडून तेथून कसाबसा पळ काढला. ही घटना रविवारी गोल्याळीसह खानापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनली होती.