सध्या पुराव्यानुसार कोव्हिड -19 अर्थात कोरोना विषाणू एकमेकाच्या संपर्कात आल्याने किंवा हवेतील सूक्ष्म थेंबातून फैलावत असल्याचे सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर मेसर्स व्हेगा एव्हिएशन प्रोडक्स प्रा. लि. बेळगाव या उद्योग समूहाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट विना कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेता येतील अशी “कोव्हीसॅक” नांवाची कोठडी तयार केली आहे. ही कोठडी अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे की वापरानंतर तिचे स्वयंचलित निर्जंतुकीकरण होते.
सध्या कोरोना विषाणु वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सध्याच्या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी वगैरे लोकांना या विषाणूच्या संसर्गाचा मोठा धोका आहे. कोरोना विषाणूंवर कोणतेही औषध उपलब्ध नसल्यामुळे सध्या स्वॅबचे नमुने तपासून निदान केले जात आहे. यासाठी डीआरडीएल हैदराबाद या कंपनीने बेळगावच्या मेसर्स व्हेगा एव्हिएशन प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सदर “कोव्हीसॅक” बनविण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर प्रमाणे मे. व्हेगा एव्हिएशन प्रोडक्स प्रा. लि. बेळगावने कोव्हीसॅक ( कोव्हिड सॅम्पल कलेक्शन कियोक्स) कोरोना नमुने जमा करणाऱ्या कोठडीची निर्मिती केली आहे. या कोठडीच्या मदतीने कमीत कमी पीपीईचा वापर करून कोरोना संशयीत रुग्णांचे स्वॅबचे नमुने जमा करता येतात. तसेच स्वयंचलित स्प्रेद्वारे आपल्या आत कोठडीचे निर्जंतुकीकरण देखील होते.
सदर कोव्हीसॅक ही कोठडी अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे की, वैद्यकीय कर्मचारी आतून किंवा बाहेरून संशयित रुग्णांचे नमुने गोळा करू शकतात. या कोठडीला बसविण्यात आलेल्या खिडकीमुळे (शिल्ड स्क्रीन) रुग्णांच्या श्वासोच्छ्वासा वाटे हवेत फेकल्या जाणाऱ्या सूक्ष्म तुषारांपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे संरक्षण होते. याखेरीज स्वॅबचा प्रत्येक नमुना गोळा करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी वैयक्तिक सुरक्षा साहित्य (पीपीई) लागणार आहे.
कोव्हीसॅक या कोठडीत बसविण्यात आलेल्या स्वयंचलित स्प्रेद्वारे 40 सेकंदासाठी 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून कोठडीच्या भिंती निर्जंतुक केल्या जातील. त्यानंतर 30 सेकंद पाणी फवारून कोठडीतील फवारलेले जंतुनाशक स्वच्छ करता येते. यासाठी अंतर्गत पाईपलाईनचीही सोय करण्यात आली आहे. नमुने जमा करण्याची ही प्रक्रिया सुमारे दोन मिनिटात पूर्ण होते. नमुने गोळा करताना रुग्णांना सूचना देण्यासाठी दुतर्फा संवाद साधू शकता येणाऱ्या व्यवस्थेमुळे ही कोठडी अष्टपैलू ठरते. निर्जंतुकीकरण कोठडीतून संशयित रुग्णांचे नमुने घेण्याची ही पद्धत देशात पहिल्यांदाच अवलंबली जात असल्याचे डॉ. जयतीर्थ जोशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ही कोठडी दुतर्फा वापरात आणता येते जर रुग्णांची संख्या जास्त असेल तर डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी कोठडीत बसून बाहेर मोठ्या संख्येने असणाऱ्या रुग्णांचे नमुने घेऊ शकतात असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. सदर कोठडी 1.2 मीटर लांबी – रुंदीची आणि 2 मीटर उंचीची असून तिच्या उभारणीसाठी 1 लाख रुपये खर्च आला आहे. डीआरडीएल हैदराबादने डिझाईन केलेली ही कोव्हीसॅक कोठडी फायबर रिनफोर्सड प्लास्टिकचा (एफआरपी) वापर करून बनविण्यात आली असल्याने वजनाने ती हलकी (सुमारे 115 किलो) आहे.