कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शहरात आणखी 5 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापैकी शहरातील कॅम्प येथे 3 तर माळ मारुती पोलीस स्थानक व्याप्तीत व ए पी एम सी पोलीस स्थानक व्याप्तीत येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आल्याने आता कॅम्प पाठोपाठ या दोन वसाहती “कंटेनमेंट झोन” म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यात काल गुरुवारी एकाच दिवशी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता आज शुक्रवारी बेळगाव शहरातील 5 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता 6 झाल्यामुळे आतापर्यंत काहीसे निष्काळजी असणाऱ्या बेळगावकरांमध्ये हळूहळू कोरोनाची दहशत फैलावू लागली आहे. कांही दिवसापूर्वी कॅम्प येथे शहरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आज शुक्रवारी कॅम्प येथे आणखी 3 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून माळ मारुती पोलीस स्थांनक व ए पी एम सी पोलीस स्थानक व्याप्तीत येथे प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळून आली आहे. यापूर्वीच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या कॅम्प परिसरात आता सर्वाधिक 4 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे येथील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ए पी एम सी व माळ मारुती स्थानक व्याप्तीतील वसाहतींना “कंटेनमेंट झोन” म्हणून घोषित करण्यात आले असून या वसाहतींना सील डाऊन करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या दोन्ही वसाहतीतील पोलीस बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला असून कोणीही घराबाहेर पडू नये असा आदेश देण्यात आला आहे. रुग्णवाहिका आणि पोलीस वाहने वगळता अन्य कोणत्याही वाहनांना कंटेनमेंट झोनमध्ये आतून बाहेर व बाहेरून आत जाण्यास बंदी असणार आहे.
दरम्यान, शहरात नव्याने 5 रुग्ण आढळून आल्यामुळे बेळगाव शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22 झाली आहे. यामध्ये हिरेबागेवाडी येथील 13, बेळगांव शहरातील 06, आणि पिरनवाडी, येळ्ळूर व बेळगुंदी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
एकंदर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 41 झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कॅम्प व्यतिरिक्त आणखी दोन वसाहतींना “कंटेनमेंट झोन” अर्थात निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे बेळगाव शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या आता 3 झाली आहे. कॅम्प परिसराला यापूर्वीच “कंटेनमेंट झोन” म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पद्धतीने शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या वाढत असल्यामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.