शहरातील निधन पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह ने आण करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या शववाहिकांचे वेळच्या वेळी निर्जंतुकीकरण केले जावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
बेळगाव महानगरपालिकेकडून शहरातील निधन पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह ने – आण करण्यासाठी शववाहिकांची सोय करण्यात आली आहे. या शववाहिकांद्वारे शहरात दररोज किमान आठ-दहा हा मृतदेह नेले जातात तथापि आजकाल एखादा मृतदेह इस्पितळातून घेऊन आल्यानंतर अथवा मृतदेहाचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर सदर शववाहिका धूऊन त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.
एका मृतदेहासाठी वापरलेली शववाहिका तशीच दुसऱ्या मृतदेहाचासाठी वापरण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. महापालिकेच्या या शववाहिकांमधून मृतदेह हा बरोबर त्याचे नातेवाईकही प्रवास करत असतात. कोरोना काळात हे धोकादायक आहे बेळगाव Live ने गेल्या 8 दिवसापासून शव वाहिकांचा आढावा घेतला असता मयतांचे नातेवाईक आणि मृतदेह वाहू वाहनांचे निर्जंतुकीकरण होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या नाजूक परिस्थितीत एखाद्या मृतदेहासाठी वापरलेल्या अस्वच्छ शववाहिकेमधून प्रवास करणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेच्या शववाहिका वेळच्या वेळी धूऊन निर्जंतुक केल्या जाणे काळाची गरज आहे. तेव्हा महापालिकेच्या आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे.