बेळगाव शहरातील कॅम्प परिसर कोरोनाच्या दहशती खालून मुक्त व्हावा यासाठी कॅन्टोनमेंट बोर्ड हॉस्पिटलने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
कॅम्प भागात अलीकडेच एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हादरून गेलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याखेरीज कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलने स्थानिकांची आरोग्य तपासणी हाती घेतली आहे. यासाठी 8 पथके स्थापन केली असल्याचे बोर्डाचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य साजिद शेख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
या आठ पथकांमधील प्रत्येक पथकात कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेतील दोन शिक्षक, एक नर्स आणि बोर्डाचे दोन कर्मचारी असतील. या सर्वांना मार्गदर्शन करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी त्या त्या वॉर्डातील सुपरवायझरची नियुक्ती केली जाणार आहे. तब्येतीच्या सर्वसामान्य तक्रारींवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व औषधे या पथकासोबत असणार आहेत, ज्यांचा स्थानिकांच्या तपासणीप्रसंगी उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे या पथकाच्या दिमतीला एक रुग्णवाहिका दिली जाईल. एखादा कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास या रुग्णवाहिकेमुळे त्याला अधिक तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यास मदत होणार असल्याचे साजिद शेख यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलमध्ये रक्त व मूत्र तपासणी प्रयोगशाळेसह आवश्यक ती सर्व आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत, असे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांनी सांगितले. त्याचप्रमाणे येथील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथकेही उत्तम दर्जाचे आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांची आरोग्य तपासणी केली जात असल्याचे बर्चस्वा यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलकडून फक्त कॅन्टोन्मेंट हद्दीतीलच नाही तर शहरातील नागरिकांचीही वैद्यकीय तपासणी केली जात आहे. यासाठी वीरेन जाडेजा यांच्या नेतृत्वखाली शहरातील नवरात्र उत्सव मंडळाच्या सदस्यांनी सदर हॉस्पिटलच्या मदतीसाठी 25 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द देऊ केला आहे. या संपुर्ण निधीचा विनियोग हॉस्पिटलच्या सुधारणेसाठी केला जाणार असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांनी सांगितले.