शहापूर येथील इशा मॉल नजीक बंदिस्त गटारीत जवळपास 24 तासाहून अधिक काळ अडकून पडलेल्या मरणासन्न अवस्थेतील एका कुत्र्याच्या पिल्लाला बावा संघटनेने शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास अग्निशामक दलाच्या मदतीने जीवदान दिले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बेळगाव पशु कल्याण संघटनेला अर्थात बावाला शुक्रवारी रात्री शहापूर येथील इशा माॅल शेजारी गटारामध्ये एक कुत्र्याचे पिल्लू अडकून पडले असल्याची माहिती देण्यात आली. सदर माहिती मिळताच बावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री बाराच्या सुमारास तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी तेथील ओंगळ अस्वच्छ गटारीमध्ये पाहणी केली असता कुत्र्याचे एक पिल्लू त्या बंदिस्त गटारीच्या मधोमध अडकून पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बावाच्या एका कार्यकर्त्याने गटारात उतरून कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु अरुंद गटार आणि प्रचंड दुर्गंधीमुळे गुदमरल्याने त्याला ते जमले नाही. तेंव्हा अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन कुत्र्याचे पिल्लू जमिनीखाली गटारांमध्ये नेमक्या कोणत्या जागी अडकून पडले आहे याचा अंदाज घेतला. त्यानंतर त्या ठिकाणचे काँक्रिट फोडून महत्प्रयासाने मरणासन्न अवस्थेतील पिल्लाला बाहेर काढले. याप्रसंगी बावाचे सदस्य अमित चिवटे वरूण कारखानीस, प्रमोद कदम, अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर सी. डी. माने, एसडीआरएफ डी. के. मडिवाळ, बी. डी. मठपती, विठ्ठल जडली, किरण कुरबेट, रियाज खान, मोदिन भागवान आदी उपस्थित होते.