2018 -19 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये नांव नोंद नसलेल्या बेघर आणि भूखंडरहितांसाठी नांवे नोंद करण्याची संधी राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील बेघर आणि भूखंडरहित असलेल्यांची नांवे येत्या 15 एप्रिलपर्यंत नोंदवून घेतली जाणार आहेत.
बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी यासंदर्भात ता. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. राज्यात भूखंड रहित आणि बेघरांची नोंद करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली यामध्ये जिल्ह्यात 2 लाख 5 हजार 671 जणांनी तर 18 हजार 278 भूखंडरहीतांची नोंद झाली असली तरी यामध्ये अनेक जणांची नांवे नोंद करणे राहून गेले होते. यामुळे पुन्हा नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने येत्या 15 एप्रिलपर्यंत ज्या बेघर आणि भूखंडरहितांची नांव नोंदणी झाली नाही त्यांची नांवे नोंदवून घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच भूखंडरहित आणि बेघरांची नोंदणी वेबसाईटवर करावी, अशी सूचनाही तालुका पंचायतीला देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत पातळीवर जागृती करून नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती ता. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी दिली आहे.