शहरात विविध सहा ठिकाणी सुरू असलेल्या इंदिरा कँटीन्सना नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद अत्यंत कमी झाल्यामुळे ही कँटीन बंद करून स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तथापि ही कार्यवाही केंव्हा होणार हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट करण्यात आलेले नाही.
शहरातील इंदिरा कॅन्टीन्सना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत चालला असून किल्ला भाजी मार्केटमधील कॅन्टीन तर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या कॅन्टीनसह अन्य एक कॅन्टीन बंद करून अन्यत्र हलवले जाणार आहे. शहरात सहा ठिकाणी इंदिरा कॅन्टीन असून याठिकाणी 5 रुपयात अल्पोपहार व 10 रुपयात भोजन दिले जाते. सदर कँटीन्स सुरू केल्यानंतर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तथापि गेल्या सहा महिन्यापासून हा प्रतिसाद कमी झाला आहे. मुंबईच्या रश्मी हॉस्पिटॅलिटी कंपनीकडे या कॅन्टीनना खाद्यपदार्थ पुरवण्याचा ठेका देण्यात आला होता.
रश्मी हॉस्पिटॅलिटी कंपनीचे तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल महापालिकेने थकविले आहे. बिल वसुलीसाठी कंपनीचा एक प्रतिनिधी रोज महापालिकेचे उंबरठे झिजवत असतो. तथापि पालिकेचे अधिकारी त्याला दाद देत नाहीत. एकंदर इंदिरा कॅन्टीनची ही योजनाच धोक्यात आली आहे. मुळात राज्यातील भाजप सरकारला या योजनेचे वावडे आहे. यापूर्वी काँग्रेस सरकार राज्यात सत्तेत असताना ही योजना लागू झाली होती.
शहरातील सहा इंदिरा कँटीन्ससाठी महापालिकेला दरमहा 28 लाख रुपयांचा आर्थिक ताण सहन करावा लागतो. या कॅन्टीनमध्ये रोज सकाळी सुमारे 2,800 लोक अल्पोपहार घेतात तर 2,900 लोक दुपारचे भोजन करतात. त्याचप्रमाणे रात्री सुमारे 1,700 लोक भोजन करतात. तथापि गेल्या काही दिवसांपासून लोकांची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. शिवाय ठेकेदाराकडूनही रात्रीच्या वेळी पुरेसे भोजन दिले जात नाही. ठेकेदाराला ही योजना पुढे सुरु ठेवण्यात रस नाही. ही सर्व परिस्थिती पाहता लवकरच शहरातील इंदिरा कॅन्टीन बंद झाले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.