Sunday, November 24, 2024

/

बेळगावची टायगर वुमन मयुरा शिवलकर

 belgaum

कॅन्सर अर्थात कर्करोग म्हंटले की प्रत्येक जण खचून जातो. कॅन्सर अर्थात कर्करोग हा दुर्धर रोग एखाद्याच्या मागे लागला तर तो अंतापर्यंत संबंधिताची पाठ सोडत नाही, तथापि या दुर्धर व्याधीवर मात करत बेळगावची एक चाळीशी पार केलेली क्रीडापटू राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे, या मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खमक्या असलेल्या या क्रिडापटूचे नाव आहे मयुरा शिवलकर.

बेळगाव मध्ये बीकॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या 46 वर्षीय मयुरा शिवलकर यांनी मॉन्ट्रियल कॅनडा येथून आयएटीए ही बहिस्त पदवी संपादन केली आहे. खाजगी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 15 वर्षे काम करणाऱ्या मयुरा यांनी अव्हीवा युके या बहुराष्ट्रीय कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक सेवा बजावली आहे. एचआर/ ट्रॅव्हल आणि जॉन डीरेमध्ये ईम्प्लांट हेड म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

मयुरा शिवलकर या टॉयथलेट आणि मॅरेथॉन धावपटू असून 2013 सालच्या ऑलम्पिक दर्जाच्या ट्रायथलॉन शर्यतीत त्यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. 2016 साली दूरशेठ मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या मयुरा यांनी 2016 च्या वयस्कांच्या पुणे मॅरेथॉनमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे 2016साली बेंगलोर येथील मॅरेथॉनमध्ये आणि कोल्हापूर ऑलम्पिक ट्रायथलॉनमध्ये खुल्या गटात त्या पाचव्या आल्या होत्या. कोल्हापूर ट्रायथलॉन त्यांनी 3 तास 21 मिनिटात यशस्वीरीत्या पूर्ण केली होती.

क्रीडापटुंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाडणार्‍या कोलंबो श्रीलंका येथे 2018 साली झालेल्या”हाफ आयर्न मॅन” शर्यतीमध्ये मयुरा शिवलकर यांनी भारतीय महिलांच्या खुल्या गटात चौथे स्थान मिळवले. अभिमानाची गोष्ट ही म्हणजे सदर शर्यत सुरू होण्यापूर्वी दहा दिवस आधी मयुरा शिवलकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तथापि खचून न जाता मयुरा यांनी कोलंबो येथील हाफ आयर्न मॅन शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण केली. या शर्यतीमध्ये समुद्रात 1.9 किलोमीटर जलतरण 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीचा अंतर्भाव होता. या शर्यतीत भाग घेणाऱ्या मयुरा शिवलकर या उत्तर कर्नाटकातील पहिल्या महिला धावपटू आहेत.

मुंबई फुल्ल मॅरेथॉन या 42 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत मयुरा पाच वेळा सहभागी झाले असून 4 तास 42 मिनिटे ही त्यांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे.

अत्यंत उमद्ये व्यक्तिमत्त्व आणि उत्तम क्रीडापटू असणाऱ्या मयुरा शिवलकर यांच्याबाबतीत कर्करोगाचे निदान झाले त्यावेळी खचून न जाता मयुरा यांनी या दुर्धर व्याधीवर यशस्वीरीत्या मात केली. इतके करून न थांबता त्यांनी एका बिगर सरकारी संघटनेच्या (एनजीओ) माध्यमातून समाजात कॅन्सरबाबत जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे. स्वतः कॅन्सर अर्थात कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली असल्यामुळे कर्करोगाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची मयुरा शिवलकर या जातीने भेट घेऊन समुपदेशन करत असतात. मयुरा या एकमेव अशा भारतीय ट्रायाथलीट आहेत की ज्यांना आयर्नमॅन श्रीलंकेतर्फे प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

Mayura shivalkar
Mayura shivalkar

मयुरा शिवलकर यांनी “टायगर मॅन” या दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत महिला गटाचे जेतेपद हस्तगत केले आहे. नागपूर येथे अलीकडेच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये थंड हवामानात नागपूरच्या अंबाझरी तलावात तापमान 12 डिग्री सेल्सिअस इतके घसरलेली असताना 3 कि. मी. जलतरण करणे, जोरदार वाऱ्याला तोंड देत 120 कि.मी. सायकलिंग करणे आणि त्यानंतर 25 की. मी. धावणे या क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव होता. या शर्यती साठी निर्धारित वेळ 12 तास 30 मिनिटे ठेवण्यात आली होती, तथापि मयुरा यांनी 9 तास 24 मिनिटांमध्ये ही शर्यत पूर्ण केली.

स्तनाच्या कर्करोगावर लालेह बशेरी लिखित बुक ऑफ ट्रम्प या अमेझॉनच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री काजोल हिच्या हस्ते झाले. त्यावेळी ख्यातनाम हिंदी अभिनेते नवाजुद्दीन सिद्दकी यांच्या हस्ते मयुरा शिवलकर यांना खास सन्मानित करण्यात आले. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर धैर्याने यशस्वी मात केल्याबद्दल हा सन्मान झाला. त्याच प्रमाणे 2019 साली क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते मयुरा यांना गौरवण्यात आले. अलीकडेच जानेवारी 2020 मध्ये बॉलिवूड अभिनेते आणि कीटोचे व्यवस्थापकीय संचालक कुणाल कपूर यांनी मयुरा शिवलकर यांची विशेष मुलाखत घेतली आहे.

वयाची चाळिशी उलटून गेली तरी एक उत्कृष्ट उत्कृष्ट क्रीडापटू होण्याबरोबरच कॅन्सर अर्थात कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीवर मात करणाऱ्या मयुरा शिवलकर यांची कारकीर्द लक्षात घेता सध्याच्या युवा पिढीसह महिलांसाठी त्या आदर्शवत आहेत, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.