आंध्रप्रदेश व हुबळी येथे देवदर्शनाला जाऊन माघारी परतताना देशव्यापी लॉक डाऊनमुळे बेळगाव रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील एका वृद्धेसह चार प्रवाशांना श्रीराम सेनेच्या(हिं) कार्यकर्त्यांनी कोल्हापूर (महाराष्ट्र) बस स्थानकापर्यंत सुखरूप नेऊन पोचविल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील श्रीशैल आणि हुबळी येथील सिद्धारूढ मठ येथे देवदर्शनाला जाऊन पुन्हा महाराष्ट्रातील आपल्या गावी परतणारे चौघे प्रवाशी देशव्यापी लॉक डाऊनमुळे बेळगाव रेल्वेस्थानकावर अडकून पडले होते. मल्लाप्पा पुंडलिक जाधव, सुनिता मल्लाप्पा जाधव (दोघे रा. राजगोळी, महाराष्ट्र) मीना अशोक चौधरी व केशराबाई शंकर चौधरी (रा. चाकसगाव, महाराष्ट्र) अशी या प्रवाशांची नावे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे स्थानकात अडकून पडल्यामुळे या सर्वांची अवस्था बिकट झाली होती. ही बाब निदर्शनास येताच खडेबाजार सब डिव्हिजनचे एसीपी चंद्रप्पा यांनी श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावशी संपर्क साधून संबंधित प्रवाशांना मदत करण्याची विनंती केली.
या विनंतीची तात्काळ दखल घेऊन श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावच्या कार्यकर्त्यांनी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. तसेच संबंधित प्रवाशांची विचारपूस करून स्वखर्चाने कार गाडीतून त्यांना महाराष्ट्रातील कोल्हापूर बस स्थानकावर सुखरूप नेऊन पोहोचविले.
याकामी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली शंकर पाटील, महेश जाधव, संतोष धुडूम, निपाणीचे ॲड. निलेश हत्ती व श्रीनिवास चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. देशव्यापी लाॅक डाऊन असूनही खडेबाजार सब डिव्हिजनचे एसीपी चंद्रप्पा यांचे परवानगी पत्र हाती असल्यामुळे कोल्हापूरपर्यंतच्या प्रवासात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण आली नाही.